काय सांगता, अजितदादा- देवेनभाऊ पुन्हा एकत्र येतील...

Fadnavis_pwar
Fadnavis_pwar

पुणे : महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. कामाचा धडाका, प्रशासनावरील घट्ट पकड, काम पूर्णत्वाकडे नेण्याची क्षमता, वैयक्तीक करिष्मा, आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्याचे कसब आणि व्हिजन ठेऊन काम करणे, असा या दोन्ही नेत्यांचा समान दुवा आहे. जवळपास समान क्षमता असणाऱ्या या नेत्यांचा एकत्र काम करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र, अजूनही दोघे एकत्र येण्याची शक्यता पूर्णपणे मावळलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अचानकपणे महाराष्ट्राचा धुरा आली. हो नाही म्हणता म्हणता त्यांनी पाच वर्षे राज्याचं नेतृत्व केलं. त्यांना पुन्हा नेतृत्व करण्याची संधी महाराष्ट्राने दिलीही, पण राजकीय गोळाबेरीज करण्यात पराभव झाला. पण, तरीही आपल्या अभ्यासूपणातून फडणवीस आपले वेगळेपण टिकवून आहेत. दुसरीकडे पक्षात संघर्ष करत अजित पवार एक- दोनदा नाही, तर चार वेळा उपमुख्यमंत्री झाले. पण, राज्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना अजून मिळालेली नाही. मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादा कधी काय करु शकतात, याचा अंदाज पवार कुटुंबियही लावू शकत नाही. मात्र, काहीही असलं तरी अजितदादा आपलं महत्व कायम टिकवून आहेत. त्यामुळेच ८० तासांसाठी का होईना, पण विरोधकांशी हात मिळवणी करुन आलेल्या अजितदादांनी पुन्हा सन्मानाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. सगळं काही माफ असणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून अजितदादांचं एकमेव नाव असावं.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचा विचार केला, तर फडणवीस आणि अजितदादा हे दोन प्रभावी नेते आहेत, हे दोन्ही नेत्यांचे तळागाळातील समर्थकही मान्य करतील. तरीही हे दोन्ही नेते एकत्र आल्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. टोकाची आणि खंदं समर्थन करणारी मते व्यक्त झाली. राजकीय गोळाबेरीजेत मागे पडल्यामुळे ही जोडगोळी स्थिरस्थावर होण्याच्या आधीच तुटली. विशेष म्हणजे जवळपास साडेसात महिन्यांच्या कालावधीतील यावर दोन्ही बाजूने म्हणावा किंवा पटेल असा खुलासा झालेला नाही. कदाचित भविष्यकालीन जुळणीसाठी तर याबाबतीत तोंडावर बोट नसेल ना? ही देखील शंका आहे. विशेष म्हणजे आजवर हे दोन्ही नेते एकमेकांना तोंडसुख घेताना पाहायला मिळत नाही. झालीच थोडीफार टीका-टिपण्णी तर तीही नावापुरती. 

(या मजकुरातील व्यक्त केलेली मते लेखिकेची आहेत..)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com