पुण्यात यंदा गणेशोत्सव होणार की नाही?; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, या संभ्रमात सगळेच आहेत. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आॅनलाईन झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन दिले. 

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, या संभ्रमात सगळेच आहेत. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आॅनलाईन झालेल्या बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन दिले. तसेच लॉकडाउनचे निर्बंध आणखी शिथील झाल्यानंतर पुण्यातील इतरही गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करुन उत्सवाची अंतिम रुपरेषा ठरविली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी संवाद साधला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, नितीन पंडित, अनिरुद्ध गाडगीळ, अ‍ॅड.प्रताप परदेशी, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, प्रशांत बधे यावेळी उपस्थित होते.
 
अशोक गोडसे म्हणाले, ''कोरोना विषाणूचा प्राद्रुर्भाव वाढताना महाराष्ट्र शासन, पोलिस व आरोग्यसेवक उत्तम रितीने काम करीत आहेत. शासन जो निर्णय देईल त्यानुसार आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करु. गणेशोत्सव मंडळे ही शासनासोबत आहेत. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाचे पाच व प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतला होता. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी देखील मंडळांचे अभिनंदन केले आहे. 

- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ९७ टक्के एफआरपी रक्कम कारखान्यांनी केली अदा!

अण्णा थोरात म्हणाले, ''शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन आरोग्यदायी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रमुख मंडळांची मुख्यमंत्र्यांसोबत आज याबाबत चर्चा झाली आहे. यापुढील काळात पुण्यातील इतर गणेशोत्सव मंडळांसोबत चर्चा करुन एकत्रितपणे साधेपणाने व निर्विघ्नपणे उत्सव कसा करता येईल, यादृष्टीने काम करण्याचे त्यांनी सांगितले. तसेच या रुपरेषेविषयीचे निवेदन पालकमंत्री अजित पवार यांना देणार आहे.

- कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची तडकाफडकी बदली; बदलीचे कारण...!

गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणुका न काढता दहा १० दिवस आरोग्यदृष्टया मंडळांनी काम करायला हवे. ज्याप्रमाणे पालखीसोहळा म्हणजेच वारीला परवानगी देता आली नाही, त्याप्रमाणे गणेशोत्सवात मिरवणुकांना देखील परवानगी देणे यंदा शक्य नाही. यंदाचा उत्सव वाजतगाजत शक्य नाही, त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवी. ती तत्वे ठरवून त्यावर चर्चा करुन पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करु, असे त्यांनी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रशासन, पोलिस यांच्याशी संवाद साधताना सांगितले. पुण्यातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय व शासन निर्णयाला देत असलेली साथ याचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. 

- 'मीटर रिडींग घेऊ द्या, नाहीतर...'; महावितरण देणार वीजग्राहकांना 'शॉक!'

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ''यंदा कोरोना आणि पाऊस अशा दोन आघाडयांवर आपल्याला लढाई लढायची आहे. उत्सवाची परंपरा कायम ठेऊन स्वरुपात बदल करावे लागतील. प्रत्येकाने आपापल्या घरातून गणरायाचे पूजन करावे, अशी जागृती आपल्याला करावी लागले. अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न आपल्याला करायला हवा. लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar appeal to celebrate ganeshotsav with simplicity