देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना आमंत्रण; 'दादा तुम्ही चहाला येत जा'

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 1 January 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार, त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले होते. टोलेबाजी होणार, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र या दोन्ही नेत्यांनी मीडीयाची दांडी उडविली.

पुणे (Pune News) : 'दादा तुम्ही मला चहाला बोलवा किंवा माझ्याकडे तरी तुम्ही चहा या. म्हणजे दोन - तीन दिवस त्याचा बातम्या येत राहतील,' असे खुले आमंत्रण देतानाच टआम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र येणार म्हणजे काय.. कुस्ती करणार.. गाणे म्हणणार हे समजायलाच वाव नाही,' अशा शब्दात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी मिडीयाची फिरकी घेतली. 

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार, त्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले होते. कार्यक्रम रंगणार. टोलेबाजी होणार, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र या दोन्ही नेत्यांनी मीडीयाची दांडी उडविली. विकासाच्या कामात राजकारण आणू नये, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भामा आसखेड योजनेचे (Bhama Askhed Project) लोकार्पण उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या प्रकल्पाच्या कामावरून श्रेय घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद देखील रंगला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आज झालेल्या कार्यक्रमात मात्र या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अधिक बोलण्यापेक्षा "त्या' विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय म्हणाले फडणवीस आणि पवार?
फडणवीस म्हणाले, 'या कार्यक्रमाची उत्कंठा पुणेकरांना जेवढी नसेल, त्या पेक्षा अधिक मीडियाला होती. दोन-तीन दिवसांच्या बातम्या बघितल्यानंतर दादा तुम्ही मला चहा पिण्यासाठी बोलवा किंवा मी तुम्हा चहासाठी बोलावीत जाईल. म्हणजे दोन-तीन दिवस बातम्या चालू राहतील. महाराष्ट्राची परंपरा आहे. विकासाची कामे असतील, तर सर्वांनी एकत्र येऊन ती पुढे न्यायाची असते. एकमेकांना सहकार्य करून पुढे जायचे असते. हे भामा आसखेड प्रकल्पावरून दिसून आले.'' तोच धागा पकडून पवार म्हणाले, 'अलीकडच्या काळात नवीन काही बातम्या मिळाल्या नाही, की त्याच त्याच बातम्या येत राहतात. त्यावर जोर धरला जातो. काय बातम्या द्यायच्या हा मिडीयाचा अधिकार आहे. राज्यकर्ते कोणी असू द्या. विकास कामात राजकारण आता काम नाही.' 

आणखी वाचा - देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ; सभागृहाबाहेर घोषणाबाजी

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी
दरम्यान, सभागृहात अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस, विकासकामांमध्ये आपण राजकारण करत नाही, असे सांगत असले तरी, सभागृहाबाहेर दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांना भिडले. आपल्या नेत्याच्या आणि पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची सभागृहाबाहेर हुल्लडबाजी  सुरू होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar devendra fadnavis criticize media bhama askhed project