अजितदादा, यापुढे वादाला पूर्णविराम

निंबूत (ता. बारामती) - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी (डावीकडून) शहाजी काकडे, सतीश काकडे, श्‍यामकाका काकडे, पवार, प्रमोद काकडे व उदय काकडे.
निंबूत (ता. बारामती) - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी (डावीकडून) शहाजी काकडे, सतीश काकडे, श्‍यामकाका काकडे, पवार, प्रमोद काकडे व उदय काकडे.

सोमेश्वरनगर - अजितदादा, १९६५-६७ पासूनच्या वादाला मी पूर्णविराम देतो. जिवंत असेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये काकडे गट तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहील. विधानसभेला विरोधी उमेदवाराची अनामत जप्त करू, अशा शब्दांत सतीश काकडे यांनी दोन पिढ्यांचा काकडे-पवार वाद संपविला. अजित पवार यांनीही विचार वेगळे असले तरी विरोधात लढून वेळ घालविण्यापेक्षा विकासाला वेळ देऊ. तुमच्या विश्वासाला जागून आगीतून फुफाट्यात असे होऊ देणार नाही, अशा शब्दांत आश्वस्त करत धन्यवादही दिले.

निंबूत (ता. बारामती) येथे ग्रामसचिवालयासह अडीच कोटी रुपयांच्या विविध सोळा विकासकामांची उद्‌घाटने पवार यांच्या हस्ते झाली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते श्‍यामकाका काकडे होते. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, प्रवीण माने, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, बाळासाहेब सोळसकर उपस्थित होते. या प्रसंगी उद्योजक आर. एन. शिंदे, ज्युबिलंटचे उपाध्यक्ष सतीश भट, दिलीप फरांदे, धनंजय काकडे आदींचा मदतकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

सतीश काकडे म्हणाले, ‘‘घरातल्या सर्वांशी बोलूनच काकडे-पवार वाद संपवत आहे. माझा गटही सर्व निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्याबरोबर राहील. आम्ही साथ देऊ. तुम्ही मुख्यमंत्री व्हा. विरोधक असूनही तुम्ही आम्हाला विकासात मदत करून मने जिंकली. मला पद नको. मात्र, शेतकऱ्यांचे भांडण तुमच्या विरोधात घेऊन येऊ शकतो. शेतकरी कृती समिती व राजू शेट्टींसोबत काम करत राहणार; पण निवडणुकीत तुमच्याचबरोबर राहणार.’’
जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे व श्‍यामकाका काकडे यांनीही मनोगतात, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना व्यक्त केली.

राजकुमार बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अच्युत शिंदे व मदन काकडे यांनी सूत्रसंचालन केले.

‘सोमेश्‍वर’विरुद्धचे दावे मागे घेणार...
सोमेश्वर कारखान्याविरुद्धचे न्यायालयात प्रलंबित असलेले तीनही दावे मी केवळ अजित पवार यांच्यासाठी विनाशर्त काढून घेत आहे. ‘सोमेश्वर’ एकरकमी एफआरपी देऊ शकतो. अजित पवार यांनी चर्चेसाठी वेळ देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन सतीश काकडे यांनी केले. यावर अजित पवारांनी, पुढील आठ-दहा दिवसांत बसून प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले.

मी निंबूतला १९९१ पासून फारच कमी वेळा आलो. पण आज सगळी कसर भरून निघाली. सतीशरावांच्या निर्णयाबद्दल आभार मानतो. माझी व काकडे कुटुंबाचीही परिसराचा विकास व्हावा व शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा ही अपेक्षा आहे. त्याकरता कशाला विरोध करायचा.
- अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com