बारामतीतील वन उद्यानाबाबत अजित पवारांनी दिली `ही` महत्त्वाची सूचना

मिलिंद संगई
Sunday, 4 October 2020

कण्हेरी नजीक साकारणाऱ्या भव्य वनउद्यान प्रकल्पाचे कामकाज येत्या वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या. 

बारामती (पुणे) :  येथील कण्हेरी नजीक साकारणाऱ्या भव्य वनउद्यान प्रकल्पाचे कामकाज येत्या वर्षभरात पूर्ण करा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधितांना दिल्या. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पुणे विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, मुख्याधिकारी किरणराज यादव आदी या प्रसंगी उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या सौंदर्यात भर पडावी व बारामतीत एक छानसा पिकनिक स्पॉट विकसित व्हावा, निसर्गाच्या सान्निध्यात बारामतीकरांना काही क्षण व्यतीत करता यावेत, या उद्देशाने बारामतीत वन उद्यान विकसित केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून कण्हेरी नजीक वनविभागाच्या 103 हेक्‍टर जागेमध्ये हे नितांत सुंदर वनउद्यान आकारास येणार आहे. या संदर्भात अजित पवार यांच्यासमोर काल सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणादरम्यान पवार यांनी काही सुधारणा सुचविल्या असून त्या दृष्टीने हे काम वेगाने पूर्ण करा, निसर्गाला कोठेही धक्का न लावता, तळ्यांसह झाडे व इतर बाबी तशाच अबाधित ठेवून वनउद्यानाची निर्मिती करा, असे सांगितले आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम आता लवकरच सुरू होणार आहे. या भागामधील निसर्गसौंदर्य अनेकांना भुरळ पाडेल असे असून या निर्मितीनंतर बारामतीला एक नवीन आकर्षण निर्माण होणार आहे. 

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

गुजर, सातव यांच्यावर जबाबदारी 
या जागेचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून इतर बाबींची पूर्तता वेगाने करण्याचे काम किरण गुजर व सचिन सातव यांच्यावर पवार यांनी सोपविले आहे. या ठिकाणी एक छान पिकनिक स्पॉट विकसित व्हावा व भविष्यात शिवसृष्टीला जोडून हे वनउद्यान व्हावे यासाठी पवार यांचे प्रयत्न आहेत. बारामतीत पर्यटनाला चालना मिळावी व नवीन पूरक व्यवसायांनाही चालना मिळावी असा या मागचा उद्देश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar ordered to complete the work of the forest park in Baramati within a year