esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Shirur Nagarparishad Building
शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे अजित पवारांनी तोंडभरून कौतुक केले

शिरूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे अजित पवारांनी तोंडभरून कौतुक केले

sakal_logo
By
नितीन बारवकर

शिरूर - शिरूर नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे तोंडभरून कौतुक करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, 'इतर शासकीय कामे करताना या कामाचा आदर्श घेतला जावा', असे बांधकाम विभागाला सूचविले होते. उपमुख्यमंत्र्यांच्या या सूचनेची दखल घेत बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी नवीन इमारतीची पाहणी करताना आवश्यक फोटो काढत बारीक-सारीक नोंदीही घेतल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंके, अधिक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे व अजय भोसले या वरिष्ठ पथकाने काल नवीन प्रशासकीय इमारतीला भेट देत सुमारे दोन तास पाहणी केली. इमारतीचे स्ट्रक्चर, भिंती यांची बारीक - सारीक माहिती घेताना, फर्निचर, सोफे, कपाट व अंतर्गत सुविधांची बारकाईने पाहणी केली. नगरसेवक विजय दुगड यांनी सर्व कामांची, त्यासाठी केलेल्या नियोजनाची तसेच इमारतीतील सुविधांची इत्थंभूत माहिती दिली. ही तीन मजली इमारत अग्निरोधक व भूकंपरोधक असून, सर्व विभागांसाठी स्वतंत्र दालने आहेत.

हेही वाचा: Pune : पालिकेच्या कचरा गाडीला मागून धडकून चालकाचा मृत्यू

वातानुकूलित अशा या इमारतीतील सर्व कामकाज संगणकीय असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आमदार ॲड. अशोक पवार, नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता एम. आर. सोनवणे, शाखा अभियंता एस. डी. मुरकूटे, तसेच मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडिवाल, संजय देशमुख व ज्योती लोखंडे हे नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

खुद्द अजितदादांनी उदघाटनापूर्वी या इमारतीची व अंतर्गत कामांची सुमारे तासभर बारकाईने पाहणी केली होती. १४ कोटी रूपयांचे हे काम व वडूज पोलिस ठाण्याच्या इमारतीचे सुमारे तीस कोटी रूपयांचे काम याची तूलना करताना त्यांनी संबंधित काम करणारे ठेकेदार, अधिकारी यांचा जाहीर पंचनामा केला होता व तिथल्या अधिका-यांना इथे आणून शिरूरची इमारत दाखवली पाहिजे, अशी खोचक टीपण्णी केली होती. पुढील पन्नास वर्षांचा विचार करून उभारलेल्या या इमारतीच्या कामात कुठलीही चूक काढायला जागा नसून, शासनाने दिलेल्या निधीचा पुरेपूर विनियोग करून, पुरेशी काटकसर करून ही वास्तू साकारली आहे. कमी खर्चात चांगले काम होऊ शकते, याबाबत अधिकारी वर्गाने दखल घ्यावी. इतर शासकीय कामे करताना शिरूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचे उदाहरण डोळ्यापुढे ठेवावे व इतर ठिकाणची शासकीय इमारतींची कामे करताना या कामाचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले होते.

हेही वाचा: बीआरटी मार्गात पीएमपीएलच्या बसची नेहमीच शर्यत

अजितदादांच्या या आवाहनाला आठ दिवस उलटत नाहीत, तोच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या पथकाने शिरूर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीला भेट दिली. या पाहणीनंतर अचूक व परिपूर्ण कामाचा शेरा अधिका-यांनी दिला. शिरूरसाठी हे एक मोठे व चांगले काम झाले असून, संस्थेशी बांधिलकी मानणारे लोक असले की, चांगले काम होते, अशी प्रतिक्रिया अतुल चव्हाण यांनी व्यक्त केली.

अजितदादांनी नगर परिषदेला मार्च व डिसेंबरच्या अधिवेशनात तब्बल २५ कोटी रूपयांचा विकासनिधी देण्याचे जाहीर केल्यानंतर व जी कामे करायची त्याचे प्लॅनिंग आजपासूनच सुरू करा, असे थेटपणे सांगितल्याने नगर परिषद परिसरातील विकासकामांना वेग येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाचवेळी निधी मिळण्याची नगर परिषदेच्या इतिहासातील ही पहिली वेळ असल्याने नगर परिषद पदाधिका-यांनीही समाधान व्यक्त केले.

loading image
go to top