विमानतळ कामाचे रडगाणे पुन्हा नको - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

‘लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम गतीने मार्गी लावा, आता मी ही विनंती करतो आहे. पुढच्या वेळी मात्र हे रडगाणे ऐकून घेणार नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुनावले. 

पुणे - ‘लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम गतीने मार्गी लावा, आता मी ही विनंती करतो आहे. पुढच्या वेळी मात्र हे रडगाणे ऐकून घेणार नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेसह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुनावले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘मुंबईनंतर हे सर्वांत मोठे विमानतळ असून ते आपल्यासाठीच आहे. पुढील पन्नास वर्षांचा विचार करा आणि काय प्रश्‍न असतील ते सोडवा,’’ अशा सूचनाही त्यांनी केल्या. 
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रिकल्चरच्या कार्यालयात पुणे शहर व जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्‍नांसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी- चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी आयुष प्रसाद, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेपैकी काही जागा ही पुणे महापालिकेच्या मालकीची, तर काही जागा ही ‘पीएमआरडीए’च्या मालकीची आहे. याशिवाय लागणारी २५ एकर जागा ही खासगी मालकीची आहे. खासगी भूसंपादनाच्या मोबदल्यात जागामालकाला टीडीआर देण्यात येणार आहे, त्यासाठी शेती झोन बदलून निवासी करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण, राज्य सरकारकडून मान्य विकास आराखड्यात हा बदल दर्शविण्यात आलेला नाही. तसेच, मोबदला मंजुरीच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे, असे पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले. या संदर्भातील प्रस्ताव तातडीने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करा. मी महापौर आणि गटनेत्यांशी बोलतो, असे त्यांनी सांगितले. 

संबंधित जागेच्या मोबदल्यात टीडीआर देण्यासाठी २०१५ मधील रेडी-रेकनरचा दर निश्‍चित करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला होता. राज्य सरकारने त्यास मान्यता दिली आहे. परंतु, त्यातही काही तांत्रिक चुका झाल्याचे नोंदणी महानिरीक्षकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर हे प्रश्‍न तातडीने मार्गी लावा, अशी सूचना पवार यांनी केली. 

‘आव्हान स्वीकारून काम करा’
लोहगाव विमानतळासाठी दररोज दीड लाख लिटर पाणी टॅंकरने घ्यावे लागते. महापालिकेकडून अद्यापही जलवाहिनीचे काम झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर ‘‘एक हजार बेडचे हॉस्पिटल वीस दिवसांत चीन उभारू शकते, तर तुम्हाला विमानतळाला जलवाहिनीचे काम करता येत नाही, हे योग्य नाही. आव्हान स्वीकारून काम करायला शिका,’’ असे पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांना सुनावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ajit pawar talking on airport work issue