अजितदादा म्हणतात, स्थिर सरकारसाठी हे करावे लागेल!

संतोष शेंडकर ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

"मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले; परंतु दोघांमध्ये काय बेबनाव झाला माहिती नाही, पण मार्ग निघाला नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता काहीही झालं तरी लगेच मतं मागायला येणार नाही. लवकरच स्थिर सरकार मिळेल,'' असे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

काहीही झाले तर एवढ्यात मते मागायला न येण्याचे प्रतिपादन; "सोमेश्‍वर'च्या गाळप हंगामास प्रारंभ

सोमेश्वरनगर (पुणे) ः ""मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले; परंतु दोघांमध्ये काय बेबनाव झाला माहिती नाही, पण मार्ग निघाला नाही. म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली. आता काहीही झालं तरी लगेच मतं मागायला येणार नाही. लवकरच स्थिर सरकार मिळेल,'' असे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दरम्यान ""तिघांनी एकत्र आल्याशिवाय मार्ग निघणार नाही. आमचे सर्वोच्च नेते चर्चा करून निर्णय घेतील,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोमेश्‍वरनगर (ता. बारामती) येथील सोमेश्वर साखर कारखान्याच्या गाळप हंगामाच्या प्रारंभावेळी ते बोलत होते.

""साहेबांची पावसातली सभा, त्यांच्याबद्दलची काहींची नको ती विधानं आणि ईडी अशा गोष्टींनी राज्यातील जनतेची मनं दुखावली आणि त्यांचं परिवर्तन निकालात झालं. त्यामुळे काहींना जबरदस्तीनं तिकीट दिलं तेही आमदार झाले. सर्वाधिक जागा मिळवूनही "ते' असमाधानी आहेत आणि आम्ही मात्र बहुमत नसतानाही समाधानी आहोत. पण शेवटी 145 चा आकडा गाठायचा आहे. कुणालाही पुन्हा निवडणूक नको आहे. येत्या मंगळवारी (ता. 19) सोनिया गांधी आणि शरद पवार यांची बैठक आहे. त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते चर्चा करून ठरवतील. आम्हालाही सर्व मित्रपक्षांची बैठक घेता आली नाही. त्यांनाही बोलावून सांगावे लागेल. आता आम्ही सत्तेत आलो तर तिजोरीची अवस्था बघून जास्तीत जास्त आश्वासनांची पूर्तता करणार,'' अशी ग्वाही पवार यांनी दिली.

 

"सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले.

 
"आता कानाला खडा'
""आम्हाला चॅनेलवरच कळालं की, आम्ही व कॉंग्रेसने पाठिंब्याचं पत्र दिलंय! आम्हाला अज्ञात ठिकाणी बसायचं होतं. सोबत काही माणसंही असतात. त्यांना त्रास नको म्हणून चॅनेलवाल्यांना "मी बारामतीला चाललोय' असं सांगितलं. लगेच मी नाराज झालो, बैठक रद्द झाली, अशा बातम्या सुरू झाल्या. साहेबांना येऊन बोलावं लागलं. त्यामुळं आता कानाला खडा. "नो कामेंटस' एवढंच म्हणणार,'' असे स्पष्ट करत अजित पवार यांनी, "लोकांनी पण अशात तथ्य आहे, असं समजू नये. मी बरंच काही (मुख्यमंत्री) व्हावं, असं तुम्हाला वाटतं; पण त्यासाठी आकडे आणि विचार जुळावे लागतात,'' असेही ते म्हणाले.

फुटाफुटी केली, तर "सातारा' होतो
भाजपचे आमदार फुटणार, असे मी कधीही म्हणालो नाही. अनेकजण प्रथमच निवडून आल्याने ते होणार नाही. शिवाय, फुटाफुटी केल्यावर काय होते, हे सातारा लोकसभेच्यानिमित्ताने आपण बघितले. कर्नाटकात फुटिरांना पुन्हा निवडणुकीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाने आमदार फोडले तर अन्य तीन पक्ष एकत्र येऊन त्या पक्षाच्या आमदाराला पाडणार हे ठरलंय, असे अजित पवार यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar's advice for stable government