'माणूसपणाकडे नेणारा अनुभव म्हणजे रंगभूमी'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

पुणे - ""जीवनात उठता- बसता नाटक जगण्याची देदीप्यमान कारकीर्द या क्षेत्रात अनेकांनी अनुभवली आहे. आजही मराठी रंगभूमीवर चांगले काम सुरू आहे. माणूसपणाकडे नेणारा आणि माणसाला उन्नत करणारा अनुभव म्हणून रंगभूमीकडे पाहायला हवे,‘‘ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी भावना व्यक्त केल्या.

पुणे - ""जीवनात उठता- बसता नाटक जगण्याची देदीप्यमान कारकीर्द या क्षेत्रात अनेकांनी अनुभवली आहे. आजही मराठी रंगभूमीवर चांगले काम सुरू आहे. माणूसपणाकडे नेणारा आणि माणसाला उन्नत करणारा अनुभव म्हणून रंगभूमीकडे पाहायला हवे,‘‘ अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी भावना व्यक्त केल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून विविध पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले, या वेळी ज्योती सुभाष बोलत होत्या. कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, कोशाध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रमुख कार्यवाह दीपक रेगे उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांना "जयंतराव टिळक स्मृती जीवनगौरव पुरस्कार‘ देऊन गौरविण्यात आले. सोहळ्यात कविता जोशी, शमा वैद्य यांना "माता जानकी पुरस्कार‘, रजनी भट यांना "प्रपंच लक्ष्मी पुरस्कार‘, वंदना आणि रवींद्र घांगुर्डे यांना "लक्ष्मी- नारायण दांपत्य पुरस्कार‘, तर भारती गोसावी यांना "चित्तरंजन कोल्हटकर स्मृती पुरस्कार‘ देऊन सन्मानित करण्यात आले.

राजदत्त म्हणाले, ""नाटकाला चांगले- वाईट दिवस येतात. मात्र, कलावंतांनी अतिशय निष्ठेने नाटक जिवंत ठेवले असून ते पुढेही नेले आहे. मराठी माणूस हा मातृभूमी आणि नाटक हे आपले वैशिष्ट्य मानूनच जगेल, असा विश्‍वास आहे. आपल्या क्षेत्रातील दिग्गजांसमोर नतमस्तक होण्याचा आदर्श नव्या पिढीने आपल्यात आणावा. या पिढीने नाट्यसृष्टीला आपापल्यापरीने मनात जागा दिली पाहिजे,‘‘

देशपांडे म्हणाल्या, ""परिस्थितीमुळे मी नाट्यक्षेत्रात आले. "मराठी रंगभूमी‘ या जयराम शिलेदार यांच्या संस्थेतून माझ्या प्रवासाची सुरवात झाली. तमाशापट आणि ब्लॅक ऍण्ड व्हाइटच्या जमान्यात मला काम करण्याची संधी मिळाली.‘‘

पुरस्काराबरोबरच नाट्यसंगीत, नृत्य अशा विविध कलाविष्कारांनी हा सोहळा रंगला होता. कार्यक्रमाचे देशमुख यांनी प्रास्ताविक, तर संजय डोळे आणि भाग्यश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रेगे यांनी आभार मानले. 

Web Title: akhil bharatiya marathi natya parishad pune