यंदा कुठे होणार साहित्य संमेलन?; स्थळाची उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत.

पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे दुष्काळाची स्थिती असल्याने संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता निर्णय घेण्यात येणार?, याबाबत उत्सुकता आहे. 

या वर्षीचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी लवकरच स्थळ निश्‍चित होणार आहे. यासाठी स्थळ निवड समितीकडून नाशिक आणि उस्मानाबादमध्ये पाहणी केली. या समितीमध्ये कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा घोडे, डॉ. रामचंद्र काळुंखे, विद्या देवधर, प्रकाश पायगुडे, प्रदीप दाते, प्रा. प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. अहवाल तयार करून तो साहित्य महामंडळाकडे देण्यात येईल. सर्व बाबी तपासून स्थळ निश्‍चित करून लवकरच जाहीर केले जाईल. 

पाहणी करताना त्या ठिकाणचे मनुष्यबळ किती, अपेक्षित निधी उभा करता येणार का? व्याख्यानासाठी जागा किती आहे? ग्रंथ प्रदर्शनासाठी किती जागा आहे? अशा निकषांचा विचार करण्यात आला आहे. 

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी समितीकडून दोन्ही ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी योग्य आणि मोठी तयारी केली आहे. याबाबतचा अहवाल साहित्य महामंडळाकडे देणार आहोत. त्यानंतर त्यातील सभासद चर्चा करून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल.
- प्रकाश पायगुडे, सदस्य, स्थळ निवड समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan place curiosity