सूरमयी संगीतात रंगणार ‘अक्षय तृतीया पहाट’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

‘सकाळ’तर्फे उद्या आयोजन; भक्‍तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांची मेजवानी

‘सकाळ’तर्फे उद्या आयोजन; भक्‍तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांची मेजवानी

पुणे - गाण्यांची परंपरा, जुन्या आठवणी व नव्या संकल्पना गप्पा व गाण्यांच्या माध्यमातून उलगडणारी ‘अक्षय तृतीया पहाट’ ही सूरमयी मैफल शुक्रवारी (ता. २८) सकाळी होत आहे. ‘सकाळ’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी ६ वाजता होणार आहे. 
महाराष्ट्राला संगीतकलेची परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्राच्या संगीत परंपरेत रसिक प्रेक्षकांच्या मनावर आपल्या स्वरांनी गेली अनेक दशके अधिराज्य गाजवणाऱ्या सुधीर फडके व श्रीधर फडके या पिता-पुत्रांचा सांगीतिक प्रवास या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडणार आहे. 

या दोघांनी संगीतबद्ध केलेली ‘देव देव्हाऱ्यात नाही’..., फुलले रे क्षण माझे.., 
विठ्ठल आवडी.., पंढरीचा चंद्रमा नभात... यांसारखी भक्तिगीतं, भावगीतं व चित्रपट गीतांच्या गाण्यांची मेजवानी पुणेकर रसिक प्रेक्षकांना मिळणार असून, गीतरामायणाच्या आठवणी, गाण्यांचा इतिहास व परंपरा 
यांचा एकत्रित अनुभव गप्पा व गाण्यांच्या स्वरूपात संगीतप्रेमींना मिळणार आहे. श्रीधर फडके, शिल्पा दातार- पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी यांच्या 
गायकीतून हा परंपरेचा ठेवा रसिकांपर्यंत पोचणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना रिडीफाईन कॉन्सेप्टस्‌च्या योगेश देशपांडे यांची असून, त्यांच्यासह अपूर्वा मोडक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. रांका ज्वेलर्स कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत. कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर उपलब्ध आहेत. काही जागा राखीव आहेत. कार्यक्रमासाठी प्रवेशिका घेऊन येणे आवश्‍यक आहे.

 कोठे - बालगंधर्व रंगमंदिर
 केव्हा - शुक्रवार, २८ एप्रिल, सकाळी ६ वा.
 सहभाग - श्रीधर फडके, शिल्पा दातार-पुणतांबेकर व शेफाली कुलकर्णी
 प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण - ‘सकाळ’ कार्यालय, ५९५ बुधवार पेठ, पुणे (सकाळी १० ते सायंकाळी ६)

Web Title: akshay tritiya pahat event by sakal