ग्रामविकासासाठी सरकार सरपंचांच्या पाठीशी -  मुख्यमंत्री

आळंदी(जि.पुणे) - सरपंच महापरिषदेमध्ये उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आळंदी(जि.पुणे) - सरपंच महापरिषदेमध्ये उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

आळंदी (जि. पुणे) - ‘‘कृषिकेंद्रित ग्रामविकासाची प्रेरणा घेण्यासाठी सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांनी पायाभूत, सामाजिक आणि आर्थिक अशा तीन पातळ्यांवर कामे करावीत. ही कामे केल्यास तुम्ही ग्रामविकासाची प्रेरणा देणारे सरपंच बनू शकता. पंचायत राज व्यवस्थेचा पाया असलेल्या सरपंचांच्या समस्या सोडविण्यासाठी सकाळ-अॅग्रोवनच्या उपक्रमात मी स्वतः आणि माझे सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,’’ असे उद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

आळंदी येथे ‘सकाळ अॅग्रोवन’च्या सातव्या दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात आज उद्‌घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, फोर्स मोटर्सचे ट्रॅक्टर विभागाचे बिझनेस हेड व वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल, ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, ‘अॅग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण व सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले होते.

राज्याच्या कृषिविकास आणि ग्रामसमृद्धीच्या वाटचालीसाठी मंथन घडवून आणणाऱ्या सरपंच महापरिषदेला पहिल्या दिवशी निवडक एक हजार सरपंचांनी अमाप उत्साहात सहभाग नोंदविला. ग्रामविकासाच्या या वारकऱ्यांना एकत्र करणाऱ्या महापरिषदेचे मुख्य प्रायोजक ‘फोर्स मोटर्स’ हे असून, स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक आहेत. राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग परिषदेत आहे.

ज्ञानोबा माउली, संत तुकाराम यांनी आपली वाणी, लिखाणातून ग्रामविकास, निसर्ग आणि जलसमतोलविषयक विचार मांडले. त्याच नगरीत सरपंच महापरिषद होत असल्याबद्दल मी ‘सकाळ अॅग्रोवन’चे अभिनंदन करतो, असे सांगून फडणवीस म्हणाले, “लोकांचा सहभाग नसल्यामुळे यापूर्वीच्या सरकारी योजना लुटून खाण्यात वाया गेल्या. आठ वर्षांपूर्वी २८ हजार कोटींचा जलसंधारण कामाचा आराखडा तयार केला गेला होता. त्यात लोकांचा सहभाग नव्हता, तर ती कामे ठेकेदारचलित होती. आम्ही साडेचार हजार कोटींत १२ हजार गावे दुष्काळमुक्त केली आहेत. योजना सरकारी असल्यास ती कोणाचीच नसते. जनतेचा सहभाग नसलेली योजना लुटली जाते. मात्र आमच्या सरकारने शेती-ग्रामविकासाच्या योजनांमध्ये जनतेला सामील करून घेतले. त्यामुळे योजना लुटण्याऐवजी जनतेनेच कामांवर लक्ष ठेवले. यातून खऱ्याखुऱ्या विकासाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.”

“राज्यात ४८ टक्के जनता शहरात, तर ५२ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. मात्र राज्यातील ५० टक्के लोकांना केवळ शेती व शेती संलग्न सेवांमधून रोजगार मिळतो आहे. त्यामुळे ग्रामविकासाशिवाय राज्याचा विकास साधला जाणार नाही. रस्ते, वीज, पाणी अशा बाबी पायाभूत कामांमध्ये असून आरोग्य, पोषण, महिला व बालकल्याण, अशा सामाजिक कामांबरोबरच रोजगारनिर्मिती करणाऱ्या आर्थिक सेवादेखील सरपंचांनी आपल्या गावांमध्ये आणाव्यात,’’ असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘‘सरपंचांना ओळखपत्र देण्यात येणार असून मानधनाचा प्रस्तावही तयार आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. चौदाव्या वित्त आयोगाने सरपंचांना ताकद देण्याचे काम केले आहे. आमचा गाव आमचा विकास याअंतर्गत विकास आराखडा तयार केला आहे. ग्रामविकासाच्या बाबत नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला असून, थेट सरपंच निवड हा त्याचाच भाग आहे. या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित व तरुण सरपंचांना संधी मिळाली. त्यामुळे गावांचे चेहरे बदलतील.’’

‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, ‘सकाळ’च्या आतापर्यंतच्या वाटचालीतील ‘ॲग्रोवन’ हा सर्वांत यशस्वी प्रयोग झाला आहे. शेतकऱ्यांचे कल्याण कसे होईल या एकमेव उद्देशाने सुरू केलेल्या या प्रयोगाला शेतकऱ्यांनी स्वीकारले आहे. ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ असो की सकाळ रिलीफ फंड, ‘सकाळ’ने नेहमीच विकासाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली आहे.’’

फोर्स मोटर्सचे ट्रॅक्टर बिझनेस हेड व वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप धाडीवाल म्हणाले, "गेल्या आठ वर्षांपासून सरपंच महापरिषदेचे मुख्य प्रायोजक म्हणून ग्रामविकासाच्या चळवळीत सहभागी होताना फोर्स मोटर्सला अतिशय समाधान वाटते. या उपक्रमामुळे आतापर्यंत राज्यातील सात हजार सरपंचांना प्रशिक्षण मिळाले असून, त्यातून अनेक सरपंचांनी आपल्या गावात प्रयोग केले आहेत.”

या वेळी हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार, नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, जिल्हाधिकारी सौरभ राव, तहसीलदार सुनील जोशी उपस्थित होते.

-----चौकट--------

‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा संवाद
‘‘सरपंच महापरिषदेत सहभागी झालेल्या सरपंचांनीदेखील केवळ एक-दोन रस्ते बांधून न थांबता पायाभूत कामे गावात करावीत. सरपंच महापरिषदेच्या रूपाने तुम्हाला प्रशिक्षित करण्याचा स्तुत्य उपक्रम ‘अॅग्रोवन’कडून होत आहे. तुमच्या समस्या अॅग्रोवनच्या माध्यमातून माझ्याकडे आल्यास मी तुमच्या पाठीशी उभा राहीन. त्यासाठी ‘अॅग्रोवन’ने तुमचा ‘ग्रुप’ तयार केल्यास मी त्यात सहभागी होईन. तसेच एक हजार गावांमधील सरपंचांशी थेट संपर्क साधण्याची माझी तयारी आहे,’’ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

कर्जमुक्ती होईपर्यंत काम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कर्जमाफी योजनेबाबत माझ्यावर टीका झाली. मात्र आम्ही शेतकऱ्यांची नोंदणी बंधनकारक केल्यामुळे ११ हजार कोटी रुपये वाचविले. बॅंकांकडून एकही बोगस खातेदार येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. योजनेनुसार राज्यातील शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत आम्ही कामे सुरू ठेवणार आहोत.”

मुख्यमंत्री म्हणाले....
- टॅंकर सुरू असलेले गाव टॅंकरमुक्त करा.
- गावातील प्लॅस्टिक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा
- विजेची समस्या सोडविण्यासाठी सोलर फिडरवर गाव न्या.
- गावामध्ये शौचालय बांधणी किंवा घरकुलाची कामे बाकी असल्यास सरकारी यंत्रणेशी संपर्क करा
- गावात बेघर व्यक्ती असल्यास संबंधित यंत्रणेकडे संपर्क साधा.
- अतिक्रमणे नियमित करण्याबाबत शासन निर्णयाची माहिती घ्यावी
- मूकबधिर किंवा - हृदयाला छिद्रे असलेली मुले असल्यास शस्त्रक्रियेसाठी शासकीय मदत मिळते. त्यासाठी सरकारी योजनांची माहिती करून घ्यावी
- महालाभार्थी वेबपोर्टलची माहिती करून घ्यावी. त्यातील सरकारी सेवांचा लाभ गावकऱ्यांना मिळवून द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com