नगरसेवक साहेब, आम्ही खेळायचं कुठं ?

विलास काटे
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

आळंदी पालिकेच्या वतीने शाळेच्या मैदानांवर टपऱ्या आणि पाइप अस्ताव्यस्त ठेवले आहेत. याशिवाय मैदानात खुरटी झुडपे वाढल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाचे क्षेत्र मोठे असूनही कारभारी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे मुलांना खेळाचा आनंद लुटता येत नाही.

आळंदी : आळंदी पालिकेच्या वतीने शाळेच्या मैदानांवर टपऱ्या आणि पाइप अस्ताव्यस्त ठेवले आहेत. याशिवाय मैदानात खुरटी झुडपे वाढल्याने मैदानाची दुरवस्था झाली आहे. मैदानाचे क्षेत्र मोठे असूनही कारभारी आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे मुलांना खेळाचा आनंद लुटता येत नाही.

आळंदी पालिका शहर स्वच्छतेच्या बाबतीत सध्या उदासीन आहे. एवढेच काय शाळेच्या आवारातील स्वच्छताही पालिका करत नाही. आळंदी पालिकेच्या सध्या चाकण चौकातील शाळा क्रमांक एक आणि चऱ्होली रस्त्यावरील शाळा क्रमांक चारचे प्रशस्त मैदान आहे. यापैकी शाळा क्रमांक चारची इमारत धोकादायक झाल्याने ती बंद केली. मात्र मैदान सुरू आहे. या ठिकाणी मात्र मैदानात पालिकेचे साहित्य, राडारोडा पडून आहे. मैदानात जनावरे चारली जात आहे. पावसाळ्यात चिखल साचल्याने मुलांना खेळाचा आनंद लुटता येत नाही. हीच अवस्था चाकण चौकातील शाळा क्रमांक एकच्या मैदानाची झाली आहे. या ठिकाणी अतिक्रमण कारवाईत काढलेल्या पत्र्याच्या टपऱ्या काही वर्षांपासून पडून आहेत. जलवाहिनीचे पाइप अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्याच ठिकाणी कचराकुंड्या आहेत. कचराही कुंडीतच जाळल्याने शाळेच्या आवारात प्रदूषण होत आहे. मैदानात मोठ्या प्रमाणात दगड गोटे असल्याने याही ठिकाणी मुलांना खेळणे शक्‍य होत नाही. एकंदर पालिका मुख्याधिकारी, शिक्षण प्रशासन अधिकारी, शालेय समिती, निवडून दिलेल्या कारभाऱ्यांचे मैदानाकडे दुर्लक्ष होत आहे. लाखो रुपयांचा खर्च पालिका करते. मात्र शाळेच्या मैदानात आजपर्यंत एकही रुपया खर्च न केल्याने दोन मोठी मैदाने असूनही गेली पंधरा वर्षे त्यांची दुरवस्था आहे. एकंदर पालिकेची अनास्थाच या दुरवस्थेला कारणीभूत आहे.

दोन्ही ठिकाणच्या मैदानात पेव्हिंग ब्लॉकच्या माध्यमातून जॉगिंग ट्रॅक आणि व्यायामाचे साहित्य बसविल्यास सर्वांनाच वापर होईल. याशिवाय मैदानात लाल माती टाकून खेळासाठी सुसज्ज बनविले तर शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना मैदानाचा वापर करता येईल. मध्यवर्ती मैदानाची जागा असूनही पालिका एक रुपया खर्च करत नसल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकांचीही नाराजी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alandi School Ground Condition