अलंकापुरीत वैष्णवांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

आळंदी - कपाळी बुक्का व केसरी गंध...गळ्यात तुळशीच्या माळा...अन्‌ मुखी ज्ञानोबा तुकारामाचा अखंड जयघोष...खांद्यावर भगव्या पताका उंचावत राज्यभरातून लाखो वैष्णवांची मांदियाळी पाच दिवसांपासून अलंकापुरीत येत आहेत. पंढरपूरच्या श्री पांडुरंगाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुंडलिकराय यांची पालखी आळंदीत पोचली. माउलींच्या समाधी दर्शनासाठी रांगेतील भाविकांना चार तास लागत आहे. 

कार्तिकी वारीतील मुख्य एकादशी सोहळा सोमवारी (ता. ३), तर माउलींचा संजीवन समाधिदिन सोहळा बुधवारी (ता. ५) आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि घराण्यातील वारी माउली चरणी समर्पित करण्यासाठी वारकरी आळंदीत येत आहेत. पंढरपुरातून श्री विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थानच्या पांडुरंगाच्या पादुका पालखीसह संत नामदेवराय आणि पुंडलिकरायाची पालखीही शुक्रवारी दाखल झाली. पांडुरंग आणि नामदेवराय यांना कार्तिकी वारीला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी गुरू हैबतबाबांची दिंडी आळंदीतून दिवाळीत पंढरपूरला जाते. 

या शिवाय आळेफाटा येथून रेड्याची पालखीही आळंदीत आली. या प्रमुख पालख्यांसह वासकर, शिरवळकर, टेंभूकर, उखळीकर, शिवणीकर, गुरुजीबुवा राशीनकर या मोठ्या फडकरी दिंडीकरी महाराजांच्या दिंड्यांचे आगमन झाले. पंढरपुरातून सुमारे साठ, तर मुळशी, मावळ, आंबेगावातून साठहून अधिक दिंड्या दाखल झाल्या. 

कोकणातून मोठ्या संख्येने वारकरी आले आहेत. महाद्वारातून इंद्रायणीकडे जाण्यासाठी एकेरी पद्धतीने रस्ता खुला असून, इंद्रायणीकडून शनिमंदिरमार्गे येण्यासाठी रस्ता बंद आहे. रविवारी (ता. २) पहाटे तीनला पवमान अभिषेक, त्यानंतर साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा, साडेचार ते साडेआठ गंगुकाका शिरवळकर आणि धोंडेपंतदादा अत्रे यांचे कीर्तन, साडेआठला धुपारती, रात्री नऊला वासकर महाराजांचे कीर्तन, त्यानंतर साडेअकराला वाल्हेकर महाराजांच्या वतीने जागर होणार आहे.

Web Title: alankapuri kartiki wari