सावधान! तुमच्या डेटाला फुटताहेत पाय

पांडुरंग सरोदे
रविवार, 13 जानेवारी 2019

कोणत्याही कार्यालयातील असंतुष्ट अधिकारी-कर्मचारी डेटाचोरी करतात. त्याद्वारे वैयक्तिक आर्थिक नुकसानीबरोबरच मोठ-मोठ्या कंपन्यांचीही फसवणूक होते. ऑनलाइन व्यवहार, नोकरी, गृहकर्ज देण्याच्या बहाण्याने होणारी फसवणूक, पेपरफुटी अशी त्याची काही उदाहरणे आहेत. 

- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे. 
 

पुणे : "तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे, आमची फायनान्स कंपनी तुम्हाला कमी व्याजदरात 8 लाख रुपये वैयक्तिक कर्ज देईल,' अशा शब्दांत अनोळखी व्यक्तीने आंबेगाव खुर्दमधील जयंत दरेकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्या व्यक्तीने वारंवार फोन करून दरेकर यांना जाळ्यात ओढले आणि काही दिवसांतच त्यांची सव्वादोन लाखांची फसवणूक झाली.

सामान्य नागरिकांची वैयक्तिक माहिती (डेटा) उपलब्ध झाल्यामुळे हे घडले. अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिक किंवा एखाद्या कंपनीच्या डेटा चोरीपासून ते जाणीवपूर्वक "लिक' करून फसवणूक करण्याचे मागील वर्षभरात 23 प्रकार घडले आहेत. 
गृहकर्ज, वाहनकर्ज, व्यवसाय, शिक्षण किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी बॅंक, सरकारी-खासगी कार्यालयाकडे नागरिकांकडून वैयक्तिक माहिती दिली जाते. त्यानंतर काही दिवसांतच संबंधित नागरिकाला अनोळखी व्यक्ती फोनद्वारे संपर्क साधून फायनान्स, विमा, टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनी किंवा सरकारी-खासगी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगतात. त्यानंतर नागरिकांकडून त्यांची इत्यंभूत माहिती मिळवून करून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहे. 

सर्वसामान्य नागरिकांचा महत्त्वाचा डेटा संबंधित संस्थांमधील व्यक्तींकडून चोरी करून बाहेरील व्यक्तींना पुरविला जात असल्याचे मूळ कारण यामागे आहे. त्यामुळे वैयक्तिक फसवणुकीसह मोठ-मोठ्या कंपन्यांचीही फसवणूक होत असल्याची सद्यःस्थिती आहे. बॅंका, वित्तीय संस्था, सरकारी-खासगी कार्यालयांत काम करणाऱ्या काही व्यक्तींकडूनच डेटाचोरीचे प्रकार होत आहेत. 

इंटरनेटचा वापर करताना काळजी घ्या

इंटरनेटवर ऑनलाइन सर्च करते वेळी ट्रॅकर सिस्टिमद्वारे नागरिकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी या स्वरूपाची माहिती काही जण मिळवितात. तसेच, इंटरनेट वापरावेळी "आय ऍग्री' बटणावर क्‍लिक केल्यानंतर त्यांच्याकडे वैयक्तिक माहिती साठविली जाते. अशा मार्गानेही डेटाचोरी होऊन फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

डेटाचोरी अथवा लिक होण्याचे मार्ग

* बॅंकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविणाऱ्या कंपन्या 
* सरकारी-खासगी कार्यालये, बॅंका, कंपन्यांचे आजी-माजी कर्मचारी 
* हॉटेल, मॉल, पेट्रोलपंपावर घेतली जाणारी माहिती 
* सोशल नेटवर्किंग साईट (फेसबुक, ट्विटर आदी) 
* विविध ठिकाणी घेतले जाणारे "फीडबॅक' 
* ऑनलाइन किंवा प्रत्यक्षात आर्थिक व्यवहार करताना 

...अशी घ्या खबरदारी 

* वैयक्तिक, गोपनीय माहिती इतरांना देऊ नये 
* ऑनलाइन व्यवहार करताना पुरेशी काळजी घ्यावी 
* सोशल नेटवर्किंग साईटवर वैयक्तिक माहिती देणे टाळा 
* खोट्या फोन कॉलला बळी पडू नये 
* डेबिट/क्रेडिट कार्ड वापरताना काळजी घेणे 
* अद्ययावत व चांगल्या अँटीव्हायरसचा वापर. 
* डेटा बॅकअप संरक्षित करणे 

इंटरनेटच्या वापरावेळी भरलेल्या वैयक्तिक माहितीचीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या चोरी होत असते. त्यामध्ये केवळ आर्थिक फसवणूक करून एखाद्याची प्रतिमा मलीन केली जाते. त्यामुळे नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे गरजेचे आहे. 

- ऍड. राजस पिंगळे, सायबर तज्ज्ञ. 

Web Title: Alert your data might be hacked