बारामतीतील दुकानांबाबत झाला मोठा निर्णय; रात्री किती वाजेपर्यंत राहणार खुली... 

मिलिंद संगई
Monday, 12 October 2020

बारामतीत आजपासून सर्व दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बारामती : कोरोनाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटू लागल्यानंतर आता प्रशासनानेही त्याची दखल घेत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीत आजपासून सर्व दुकाने सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनीही याला दुजोरा दिला असून आजपासून बारामतीची व्यापारपेठ रात्री नऊपर्यंत सुरु असेल, असे त्यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत गेल्या आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने घटली. काल बारामतीत 59 तपासण्या झाल्या, त्या पैकी 15 जण पॉझिटीव्ह आले. दरम्यान कोरोनाच्या मृत्यूच्या आकड्याने काल शंभरी पार करत 102 चा आकडा गाठला आहे. बारामतीतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांहून अधिक झाले असल्याने हा एक दिलासा आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने त्यांच्या संपर्कातील रुग्णांचेही प्रमाण कमी झाले आहे. आरोग्य व्यवस्थेवर गेले सात महिने असलेला ताण हळुहळू कमी होऊ लागला आहे. शहरात आता रुग्णांना व्यवस्थित खाटा मिळत असून इंजेक्शनचाही तुटवडा दूर झाला आहे. दवाखान्यांवरील अतिरिक्त ताणही कमी होऊ लागला आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आगामी काळातील सणासुदीचे दिवस घटस्थापना, दसरा व त्या नंतर दिवाळी पाहता प्रशासनाने बारामतीत रात्री नऊ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. या मुळे दुकानदारांसह ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. दिवसभराची कामे संपवून आता लोक खरेदीसाठी बाहेर पडू शकतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, व्यापारपेठेतील सर्वच दुकानदारांकडून गर्दी टाळण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असून ग्राहकांनीही गर्दीच्या वेळा टाळून लवकर आपापली खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाजारपेठेची वेळ सुरळीत झाल्यामुळे बारामतीचे अर्थकारण पुन्हा पूर्ववत होण्याची प्रक्रीया आता सुरु झाल्याचे मानले जात आहे. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all shops in Baramati will be allowed to remain open from 9 am to 9 pm-