महसूल विभागाची लक्तरे वेशीला टांगली

भरत पचंगे
Thursday, 6 August 2020

आम्ही ट्रक चोरून नेले नाहीत. त्यासाठी नायब तहसीलदारांना प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे साडेचार लाख रुपये मोजले आहेत, असे प्रतिज्ञापत्र तीन ट्रक पळविल्याचा आरोप असलेल्या तिघांनी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना सादर केले.

शिक्रापूर (पुणे) : आम्ही ट्रक चोरून नेले नाहीत. त्यासाठी नायब तहसीलदारांना प्रत्येकी दीड लाख रुपयांप्रमाणे साडेचार लाख रुपये मोजले आहेत, असे प्रतिज्ञापत्र तीन ट्रक पळविल्याचा आरोप असलेल्या तिघांनी शिरूरच्या तहसीलदार लैला शेख यांना सादर केले. त्यामुळे महसूल विभागाची लक्तरे वेशीला टांगली आहेत. तहसीलदार शेख आणि फौजदार राजेश माळी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

प्रत्येक बारामतीकराची आजपासून होणार तयारी

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील पुरवठा विभागाच्या गोदामातून 14 जुलै रोजी चार ट्रक पळवून नेले गेले. मूळ महसुली असलेल्या या प्रकरणाला गुन्हेगारी कलमांद्वारे पोलिसांकडे वर्ग करत असताना आता या प्रकरणात नवीनच कलाटणी मिळाली आहे. कारण, यातील मूळ गाडी मालक प्रवीण जयवंत घावटे व संजय रामदास कुरंदळे (रा. दोघेही अण्णापूर, ता. शिरूर) व मच्छिंद्र पोपट ओझरकर (रा. अरणगाव, ता. शिरूर) यांनी मंगळवारी (ता. 4) एका प्रतिज्ञापत्राद्वारे तहसीलदार लैला शेख यांना कळविले आहे की, वरील तीन ट्रकसाठी दंड म्हणून नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांनी 12 जुलै रोजी प्रत्येकी दीड लाख रुपये, असे एकत्रित साडेचार लाख रुपये स्वीकारले आणि कुठलीच पावती दिली नाही. मात्र, या साडेचार लाखांमुळेच गोदाम सुरक्षा रक्षक डाळिंबकर यांनी गाड्या सोडल्या. या रकमेच्या पावत्या अद्यापही वट्टे देत नसल्याने त्यांनी साडेचार लाखांचा अपहार केल्याचे या प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे. 

न्यायालयात केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनवाई

याबाबत तहसीलदार यांनी श्रीशैल वट्टे व गोडावून सुरक्षा रक्षक डाळींबकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या असून वट्टे यांना यापूर्वी अशीच एक नोटीस बजावूनही त्यांनी अद्याप उत्तर दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर, फौजदार राजेश माळी यांनी सांगितले की, वरील प्रतिज्ञापत्र दिल्याचे ऐकून मीही अचंबित झालो असून, तिघांनाही पुन्हा चौकशीस बोलाविले आहे 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, नायब तहसीलदार श्रीशैल वट्टे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाईल सतत एंगेज राहिल्याने त्यांची बाजू समजू शकलेली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alleged that the Deputy Tehsildar took money to release the confiscated truck