युतीसाठी शिवसेनेचा अल्टिमेटम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

पिंपरी - युतीबाबत 20 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी भाजपला दिला आहे. दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली असून, जागेचे समसमान वाटप होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपमानस्पद प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. युतीबाबत शिवसेनेची भूमिका त्यांनी शुक्रवारी (ता. 13) पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

पिंपरी - युतीबाबत 20 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असा अल्टिमेटम खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि श्रीरंग बारणे यांनी भाजपला दिला आहे. दोन वेळा सकारात्मक चर्चा झाली असून, जागेचे समसमान वाटप होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अपमानस्पद प्रस्ताव स्वीकारणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. युतीबाबत शिवसेनेची भूमिका त्यांनी शुक्रवारी (ता. 13) पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख राहुल कलाटे, नगरसेवक धनंजय आल्हाट, मधुकर बाबर, गजानन चिंचवडे, भगवान वाल्हेकर आदी या वेळी उपस्थित होते.

बारणे म्हणाले, 'युतीबाबत स्थानिक पातळीवर चर्चा करा, असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार आत्तापर्यंत दोन वेळा भाजपच्या नेत्यांशी सकारात्मक चर्चा झाली. कोणत्या ठिकाणी कोणाचा उमेदवार सक्षम आहे, त्या निकषावर जागावाटप करण्याचे ठरले आहे.

भाजपने अवास्तव जागांची मागणी करू नये. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने जादा जागा लढविल्या होत्या. जागेचे वाटप समसमान होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र अपमानास्पद प्रस्ताव स्वीकारणार नाही. युतीबाबतचा निर्णय 20 तारखेपर्यंत घ्यावा, असे आम्ही त्यांना सांगितले आहे,''

'एकीकडे भाजप राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे. दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांना भाजपत प्रवेश देत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात अडथळे आणल्याने झोपडीधारक नाराज आहेत. या दोन्हींचाही फटका भाजपला निवडणुकीत बसेल. आरपीआय किंवा इतर पक्षाशी सध्या भाजपची युती आहे. त्यामुळे भाजपनेच त्यांना आपल्या कोट्यातून जागा द्याव्यात. शिवसेना आपल्या कोट्यातून जागा देणार नाही,'' असेही बारणे यांनी स्पष्ट केले.

युती झाली तरच सत्ता
बारणे म्हणाले, 'भाजप आणि शिवसेना आम्ही दोघांनीही वेगवेगळे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून युती झाली तरच महापालिकेवर सत्ता येईल, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यामुळे आम्ही भाजप व शिवसेना- दोन्ही पक्ष युतीसाठी आग्रही आहोत. युती झाल्यास दोन्ही पक्षांचा एकत्र वचननामा असेल. निवडणुकीनंतर सत्ता आल्यावर कशाप्रकारे कारभार करायचा, याबाबतही युतीची बोलणी करतानाच चर्चा होणार आहे.

'युतीचे शासन आल्यास अनधिकृत व शास्तीकर याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी भूमिका आम्ही यापूर्वीही मांडली आहे. परंतु, बारणे यांना निर्णयाची माहिती नाही, अशी टीका शहरातील काही नेत्यांनी केली होती. मात्र, अद्यापपर्यंत याबाबत निर्णय झालेला नाही. याचाही फटका निवडणुकीत भाजपला बसेल,'' असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंची 13 फेब्रुवारीला सभा
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराकरिता आदित्य ठाकरे यांची चार फेब्रुवारी रोजी, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 13 फेब्रुवारी रोजी सभा होईल, असेही बारणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: alliance shivsena altimates