युतीसाठी आदेशाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

युती होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेत्यांकडून दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप व घटक पक्षांसाठी ७५ आणि शिवसेनेला ५३ जागा, असा नवा प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे. त्याबाबत पालकमंत्र्यांशी आज रात्री चर्चा होईल, त्यानंतरच पुढील निर्णय होऊ शकतो.
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

पिंपरी - महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्षांसह तुम्ही ७५ जागा लढवा, आम्ही ५३ जागा लढवू, असा प्रस्ताव भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेने ठेवल्याचे समजते. ही निवडणूक भाजप-शिवसेनेने एकत्र लढवावी, अशी दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची इच्छा असल्याने ‘युतीला प्रतीक्षा पक्षश्रेष्ठींच्या आदेशाची...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

भाजप-शिवसेनेत युती झाल्यास महापालिकेत सत्ता आणणे सहजशक्‍य होणार आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी युती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. युतीसंदर्भात आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. त्यात ठोस मार्ग निघालेला नसल्याने युतीचे घोडे अडकून पडले आहे. आता शिवसेनेने पुढाकार घेऊन ७५-५३चा प्रस्ताव भाजपला दिला आहे. त्यावर होणाऱ्या बैठकीवरच युतीबाबत अंतिम निर्णय अवलंबून आहे. 

भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागांपैकी काही मित्रपक्षांना सोडाव्या लागणार असल्याने भाजपच्या वाट्यातील जागांचा आकडा कमी होईल. शिवसेना मात्र ५३ जागा लढविणार आहे. हा प्रस्ताव भाजपला अमान्य झाल्यास दोन्ही पक्ष ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसतील.

मुख्यमंत्री युतीसाठी आग्रही
मुंबई महापालिकेसह राज्यात इतर महापालिकांत युती होईल अथवा नाही, हे भाजप-शिवसेना यांच्यातील चर्चेवर अवलंबून आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवडच्या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पातळीवर जागावाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्‍यता आहे. मुंबईकरिता मुख्यमंत्री फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडूनच युतीबाबत अंतिम निर्णय होणार आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडची राजकीय परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्र्यांनी युतीचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आर्थिक, राजकीय स्थान विचारात घेऊनच तसा निर्णय त्यांनी घेतल्याने येथे युती होण्याची शक्‍यता अधिक आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतचा अंतिम निर्णय होऊ शकतो.

युती होण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक नेत्यांकडून दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली आहे. भाजप व घटक पक्षांसाठी ७५ आणि शिवसेनेला ५३ जागा, असा नवा प्रस्ताव शिवसेनेने दिला आहे. त्याबाबत पालकमंत्र्यांशी आज रात्री चर्चा होईल, त्यानंतरच पुढील निर्णय होऊ शकतो.
- आमदार लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: Alliance wait for the order