पवना धरणात ॲलिगेटर मासा

पवना धरणात ॲलिगेटर मासा

पवनानगर - पवना धरणात इतर माशांना, नागरिकांना व पर्यटकांना घातक असलेला ‘ॲलिगेटर’ हा उत्तर अमेरिकेतील दुर्मीळ मासा सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कामशेत येथील मच्छीमार महेश तारू यांच्या जाळ्यात अडीच किलो वजनाचा हा मासा दिसला. या माशाचे तोंड मगरीसारखे असून तीक्ष्ण दात, जीभ, पाठीचा भाग तीव्र टणक, भयानक डोळे असल्याने उत्सुकतेपोटी त्यांनी तो घरी आणला. त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. 

ॲलिगेटरविषयी
गार प्रजातीच्या या माशाचे अस्तित्व लाखो वर्षांपूर्वीपासून असल्याचे कळते. विशेषतः याला सुसरीसारखे तोंड असते. पाठ व शेपटीचा भाग माशासारखा असतो. हा मासा पाण्यातील इतर जलचरांना आपले भक्ष्य बनवतो.

हा मासा सापडल्यानंतर आम्ही पवना धरणावर जाऊन त्यासंदर्भात चौकशी करून पंचनामा केला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा मासा धरणात सापडला आहे. 
- जे. एम. भोसले, सहायक मत्स्यविकास अधिकारी

मत्स्य विभागाशी याबाबत चर्चा केली आहे. याचा अहवाल त्यांनी पाटबंधारे विभागाला द्यावा. पर्यटक योग्य ती परवानगी घेऊनच धरण पाहण्यास येऊ शकतात. प्रशिक्षितांकडूनच मासेमारी करणे आवश्‍यक आहे. याबाबतची माहिती मत्स्य विभागाला देण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.
- ए. एम. गदवाल, धरण शाखा अभियंता, पवना पाटबंधारे विभाग

ॲलिगेटर गार
 हा मासा गार वर्गातील सर्वांत मोठा मासा आहे. उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यामध्ये हा आढळतो. 
 शार्क माशासारखीच त्याची पचनसंस्था असते.
 आजवर सापडलेला सर्वांत मोठा मासा आठ फूट लांब आणि सुमारे १४८ किलोंचा होता.
 पवना धरणात सापडलेला हा मासा १७ सेंटिमीटर लांब आणि अडीच किलोंचा होता.
 माशांच्या इतर प्रजातींना हा मासा झपाट्याने संपवत असल्याने त्याला ‘ट्रॅश फिश’ किंवा ‘न्यूसन्स स्पेसिस’ असेही संबोधले जाते.
 दादरमध्येही २०१५ मध्ये हा मासा आढळला होता.
 २०१६ मधील एका सर्वेक्षणानुसार मुंबईतील पवई तलावातही हा मासा आढळला होता.

तज्ज्ञांच्या मते डॉ. माधव घाटे 
 हा मासा धरणात बाहेरून सोडला असावा.
 अमेरिकेत संरक्षित मासा असून, त्याला मारण्यास बंदी आहे.
 हा मासा कुणी सोडला हे शोध घेणे अवघड आहे.
 मेक्‍सिको, सिंगापूर, हाँगकाँग, खाडीच्या पाण्यातही सापडल्याची उदाहरणे आहेत.
 हा मासा पवना धरणात एवढ्या लांब येणे अवघड.
 हा गोड्या पाण्यातील छोटे मासे खाणारा, पाणकोंबड्या खाणारा असून माणसाला इजा पोचवत नाही. 
 या माशाचे सुसरसारखे तोंड असून, गंगेत सापडणाऱ्या सुसरशी साधर्म्य आहे.
 सर्वांत जुना प्राचीन काळातील मासा असून, त्याचे १५० दशलक्ष वर्षे जुने जीवाश्‍म सापडले आहेत. 
 हा मासा खूप वर्षे जगणारा आहे. 
 अंगावरील खवले कडक आणि मोठे शंकरपाळ्यासारखे, तकतकीत केस असतात.
 ॲक्वारियममध्ये आणलेले मासे नकोसे झाल्यावर नदीत किंवा धरणात सोडले जातात. त्यातील हा प्रकार असावा.
 या माशांची संख्या जास्त असल्यास स्थानिक जलविविधतेवर परिणाम होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com