
....त्यांची ती बासरी मंजुळ बोलत होती आणि रसिक डोलत होते. वेणूत ते प्राण फुंकत होते. त्यामुळे जिवंत झालेली मुरली कधी शास्त्रीय सुरावट तर कधी चित्रपटगीतांची आतषबाजी करत होती. विविधरंगी भावभावनांना आवाहन करणाऱ्या स्वरांचा अमृतवर्षाव त्यांच्या अलगुजातून होत होता. निमित्त होते भारतीय संस्कृतीत पुराणकथांमधील कृष्णाच्या संदर्भामुळे अमर झालेली बासरी अमर ओक यांच्या ‘अमर बन्सी’ या अडीचशेव्या मैफिलीचे.
पुणे - ....त्यांची ती बासरी मंजुळ बोलत होती आणि रसिक डोलत होते. वेणूत ते प्राण फुंकत होते. त्यामुळे जिवंत झालेली मुरली कधी शास्त्रीय सुरावट तर कधी चित्रपटगीतांची आतषबाजी करत होती. विविधरंगी भावभावनांना आवाहन करणाऱ्या स्वरांचा अमृतवर्षाव त्यांच्या अलगुजातून होत होता. निमित्त होते भारतीय संस्कृतीत पुराणकथांमधील कृष्णाच्या संदर्भामुळे अमर झालेली बासरी अमर ओक यांच्या ‘अमर बन्सी’ या अडीचशेव्या मैफिलीचे.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘सकाळ’ प्रस्तुत ‘अमर बन्सी’ या कार्यक्रमाचे प्रायोजक श्रीराम बिल्डर्स (रिअल इस्टेट), ‘अंतर्नाद’ व ‘गर्ल फ्रेंड’ मूव्ही हे होते. ओक यांच्याबरोबरच श्रीराम बिल्डर्सचे भागीदार अजीत कुलकर्णी व नितीन कुलकर्णी, गर्लफ्रेंड या चित्रपटाचे निर्माते अनीश जोग यांचा सत्कार ‘सकाळ’चे बिझनेस हेड - इव्हेंट्स राकेश मल्होत्रा यांच्या हस्ते करण्यात आला. अंतर्नादचे शेखर व अमित गोखले, ज्येष्ठ बासरीवादक पंडित केशव गिंडे, प्रसिद्ध गायक पंडित रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये आदींचा सत्कार ओक यांनी केला.
अडतीस इंच ते सहा इंच लांबीच्या बासऱ्यांवरील प्रात्यक्षिक दाखवत ओक यांनी मराठी भावगीते सादर केली. मधुवंती रागातील सुरावट छेडून त्यावर आधारित, तसेच झिंझोटी या रागावर आधारित हिंदी चित्रपट गीते त्यांनी वाजवली. ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेले ‘ने मजसी ने’ हे देशभक्तीपर गीत विशेष दाद मिळवून गेले.‘आता वाजले की बारा’ या लावणीवर टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस पडला. संगीतकार मदनमोहन, रोशन, राहुल देव बर्मन, इलया राजा, रहमान आदीची गाणी बासरीवर वेगळाच गोडवा घेऊन अवतरली. ‘पुण्यातूनच या कार्यक्रमाची सुरवात होऊन तो जगभर नावाजला गेला. मात्र शतकी, द्विशतकी आणि अडीचशेवी मैफल यांसारखे महत्त्वाचे टप्पे पुण्यातच साजरे करतो,’ असे ओक यांनी मनोगतात सांगितले.
प्रसाद जोशी व अर्चिस लेले (तबला), नीलेश परब (जेम्बे, ढोलकी), विक्रम भट (दरबुका), अभिजीत भदे (वेस्टर्न रिदम), दर्शना जोग आणि सत्यजीत प्रभू (की बोर्ड) यांनी साथ केली. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले.