पहाटे दूधविक्री; दुपारपर्यंत नोकरी; सायंकाळी शाळा 

अवधूत कुलकर्णी  
शुक्रवार, 29 जून 2018

पिंपरी - मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची कैफियत मांडत होता. 

पिंपरी - मी सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत घरोघरी दुधाच्या पिशव्या टाकतो. त्यानंतर साडेआठ ते दुपारी दोनपर्यंत एका कंपनीत नोकरी करतो. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत शाळेत येतो. चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्रप्रशालेतील अमर भूल हा दहावीतील विद्यार्थी त्याची कैफियत मांडत होता. 

एकीकडे शहरात सुखवस्तू कुटुंबात राहणारे काही विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करताना दिसतात, तर दुसरीकडे नोकरी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावून शिकण्याची जिद्द बाळगणारे विद्यार्थी आढळतात. अमरची आई धुण्या-भांड्याची कामे करते, तर वडील बिगारी काम करतात. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. तरीही अमरमध्ये शिकण्याची जिद्द दिसली. त्यामागे त्याच्या आई-वडिलांची प्रेरणाही मोठी आहे. 

या विद्यार्थ्यासारखीच कमी-अधिक परिस्थिती असणारे सुमारे 250 ते 300 विद्यार्थी चिंतामणी रात्र प्रशालेत आठवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेतात. या पैकी केवळ आठवीतील मुलांना महापालिकेकडून क्रमिक पुस्तके मोफत मिळतात. या शाळेत आठवी ते दहावीसाठी वर्षाला 250 रुपये, तर अकरावी आणि बारावीसाठी अडीच हजार रुपये शुल्क आहे. यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातूनच शिक्षकांच्या वेतनासह अन्य खर्च भागवावा लागत आहे. 

बहुतांश विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत. ते त्यांच्या मामा-मामी अगर काका-काकूकडे राहून शिक्षण घेत आहेत. हॉटेल, बेकरी, रुग्णालये, टेंपो चालविणे, गवंडी, बिगारी, किराणा दुकानात नोकर यांसारखी कामे करून विद्यार्थी शिकत आहेत. तळेगाव, लोणावळा, खंडाळा, कर्जत येथूनही विद्यार्थी येतात. 

शाळेला, रोटरी क्‍लब ऑफ निगडीने चार संगणक नुकतेच भेट दिले; मात्र संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी शाळेला आणखी किमान आठ संगणकांची गरज आहे. विद्यार्थ्यांना चांगली रोजगारसंधी मिळावी, म्हणून "टॅली'सारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा मानस आहे. 

शाळेच्या शुल्कवाढीला मर्यादा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वह्या, पुस्तकांच्या खर्चासह संगणक प्रयोगशाळा यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सतरंजी, चटयांचीही शाळेला गरज आहे. भविष्यात फेटे बांधणे, जिम मार्गदर्शक, योगा प्रशिक्षण यांसारखे अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. 
- सतीश वाघमारे, मुख्याध्यापक, चिंतामणी रात्र प्रशाला, चिंचवड स्टेशन 

मी 2006 मध्ये दहावीत होते; परंतु आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी यंदा दहावी उत्तीर्ण झाले. याच शाळेत अकरावी (वाणिज्य) शाखेला प्रवेश घेतला आहे. पुढे आणखी शिकण्याची इच्छा आहे. 
- आशा अवटे, रा. चिंचवड स्टेशन 

Web Title: amar bhul story ssc pass