चिमुकल्यांच्या जादुई बुद्धिमत्तेने प्रेक्षक थक्क

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 सप्टेंबर 2016

गुणवंत आणि होतकरू विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून "सकाळ इंडिया फाउंडेशन‘ काम करत आहे. आर्थिक अडचणींमुळे अशी मुले विविध स्पर्धा, उच्च शिक्षण आणि संशोधनापासून वंचित राहू नयेत म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकांनी मदतीचा हात पुढे करावा. ही मदत "सकाळ इंडिया फाउंडेशन‘ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवेल. त्यामुळे अधिकाधिक मुलांना आपले स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल.
- डॉ. कालगावकर

पुणे - रंगमंचावर जादूचे खेळ पाहून आपण थक्क होतो; असेच जादुई वाटणारे गणितावर आधारित खेळ बुद्धिमत्तेच्या जोरावर चिमुकल्यांनी सादर
केले आणि प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. हे खेळ सादर करत होते अवघ्या पाच ते पंधरा वर्षे वयाची मुले.

जागतिक पातळीवरच्या "मेंटल ऑलिंपिक्‍स‘ स्पर्धेत पुण्यातील ओम धुमाळ, प्रथमेश तुपे आणि मेघ कशीलकर हे विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यांच्यासह
"जिनिअस कीड‘ या संस्थेचे प्रमुख पीटर नरोना यांना "सकाळ इंडिया फाउंडेशन‘तर्फे प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत फाउंडेशनचे उपाध्यक्ष एस. पद्‌मनाभन यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी "सकाळ‘चे संपादक मल्हार अरणकल्ले, फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर, प्रशिक्षक आनंद महाजन उपस्थित होते. मदतीच्या धनादेश वाटपानंतर "जिनिअस कीड‘मधील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर येऊन आपल्यातील तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन घडवले. ते अनुभवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सभागृह तुडुंब भरले होते.

पडद्यावर धावणारे आकडे लक्षात ठेवून एका क्षणात त्या आकड्यांची बेरीज सांगणे, काही सेकंदांत क्‍युबवरील वेगवेगळे पझल्स सोडवणे, जन्मतारीख सांगताच त्या दिवशीचा वार कोणता, हे लगेचच सांगणे, पिसलेल्या 52 पत्त्यांचा क्रम अचूकपणे चुटकीसरशी सांगणे... असे जादुई वाटण्यासारखे खेळ मुले सादर करत होती. मोबाईलमधील कॅलक्‍युलेटरची मदत घेऊन या मुलांच्या आधी गणित सोडवू म्हणणारे प्रेक्षकही या "स्पर्धे‘त मागे पडत होते. त्यामुळेच वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांमधून या चिमुकल्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्स्फूर्त दाद मिळत होती.

पद्‌मनाभन म्हणाले, ‘भारतात स्मरणशक्तीची खूप मोठी परंपरा आहे. स्मरणशक्तीवरील भारताचे वर्चस्व कायम आहे. नवी पिढीसुद्धा यात कुठेही कमी नाही.‘‘ नरोना म्हणाले, ‘भारताकडे जगाला हरवणारी हुशारी आहे. ती अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला दिसते. एका क्षणात उत्तरे देणे ही जादू नसून
स्पर्धकांमधील हुशारी आहे.‘‘

Web Title: amazaing mind of a child