सख्खे भाऊ शेततळ्याजवळ खेळत होते अन्‌... 

नवनाथ भेके
सोमवार, 25 मे 2020

शेततळ्याजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोहम गणेश गरकळ (वय 10) व शुभम गणेश गरकळ (वय 8) हे दोन सख्खे भाऊ खेळत होते.

निरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील वळती येथील भागडेश्वर डोंगराजवळ असलेल्या शेततळ्यात सोहम गणेश गरकळ (वय 10) (मूळ गाव पारगाव, जि. बीड) या दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मुलांचे आजोबा व कुटुंब शेतावर गेल्यानंतर सोमवारी (ता. 25) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. 

झोपडीतील "लक्ष्मी'पुढे कुबेराची श्रीमंती पडली फिक्की... 

वळती गावापासून काही अंतरावर भागडेश्‍वर डोंगर आहे. या डोंगराजवळ महादू नरहरी भोर यांचे शेततळे आहे. या तळ्यात सुमारे 8 ते 10 फूट खोल पाणी होते. या शेततळ्याजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोहम गणेश गरकळ (वय 10) व शुभम गणेश गरकळ (वय 8) हे दोन सख्खे भाऊ खेळत होते. त्यावेळी सोहम हा शेततळ्याच्या पाण्यात पडला. त्यामुळे छोटा शुभम याने आरडाओरडा केला. त्यानंतर जवळ असलेले नागरिक तेथे धावून आले. त्यांनी पाण्यात बुडालेल्या सोहम याचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्याचा बाहेर काढला. 

पुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग  

याबाबत माहिती दिल्यानंतर मंचर पोलिस ठाण्याचे सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस नाईक ईश्वर कदम हे पाहत आहेत. दरम्यान, सोहम व शुभम हे दोघेही आपल्या आईचे वडील भगवान गंगाधर गिते यांच्याकडे शिक्षणासाठी होते. सोहम याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambegoan- Brother was playing near the pond