आंबिल ओढ्याची स्वच्छता महिन्यानंतर सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

ओढ्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यात येत आहेत. पुढील चार दिवसांत बहुतांश कामे पूर्ण होतील. ज्यामुळे पुराचा धोका निर्माण होणार नाही.
- माधव देशपांडे, उपायुक्त, महापालिका

पुणे - आंबिल ओढ्यातील राडारोडा, कचरा आणि गाळ काढण्याच्या कामास महापालिकेने तब्बल महिन्यानंतर (मंगळवारपासून) सुरवात केली. स्वच्छतेचे काम हाती घेतले असले, तरी येथील भिंत बांधण्याबाबत अजूनही प्रशासन नव्या धोरणाची वाट पाहत आहे. त्यामुळे धोरण कधी तयार होणार आणि रहिवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य कधी मिळणार, हा प्रश्‍न कायम आहे. 

येथील रहिवाशांच्या दृष्टीने आवश्‍यक ती कामे सुरू केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला. 

पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर येऊन येथील काही घरे वाहून गेली असून, काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढ्यालगतची भिंत पडल्याने तेथील राडारोड्यात भर पडली आहे. तर पावसाच्या पाण्याने वाहून आलेला कचरा उचललेला नाही. परिसरात अजूनही जोरदार पाऊस पडत असल्याने या भागाला पुराच्या धोका आहे. पूर येऊन आता दीड महिना झाला, तरी ओढ्याच्या परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या नसल्याचे दिसून आले. तेथील सीमा भिंत बांधणे अपेक्षित असताना महापालिकेने ओढ्यालगत भराव टाकला. तोही वाहून जाण्याची शक्‍यता असल्याने रहिवाशांमध्ये घरबराट आहे. या पार्श्‍वभूमीवर पुनर्वसनासह ओढा सुरक्षित करण्याची मागणी करून पूरग्रस्तांनी सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambil odha cleaning start