Pune Rain : २५ सप्टेंबरची पुनरावृती टळली; यंदा जास्त पाऊस होऊनही नुकसान कमीच

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

कात्रज येथील वरच्या तलावात अंबिल ओढा आणि गुजरवाडी येथून येणाऱ्या ओढ्याचे पाणी येते. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर या दोन्ही ओढ्यांना पूर आल्याने कात्रजचा वरचा आणि खालचा असे दोन्ही तलावावरून पाणी वाहिले.

पुणे : पुण्यात गेल्या वर्षी 25 सप्टेंबरला रात्रभरात 87.3 पाऊस पडलेला, बुधवारी (ता.14) रात्री 115.5 मिलिमीटर पाऊस कोसळल्यानंतरही आंबिल ओढ्याने धोक्‍याची पातळी ओलांडली नाही. याचं श्रेय आंबिल ओढ्याच्या उत्कृष्ट जल व्यवस्थापनाला जातं. 

हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर एखाद्या धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन ज्या प्रकारे केले जाते. त्याच प्रकारे यंदा प्रथमच कात्रज येथील वरच्या तलावात येणाऱ्या पाण्याचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे बुधवारी रात्री प्रचंड पाऊस होऊन देखील गेल्या वर्षीच्या 25 सप्टेंबरची पुनरावृती होऊ शकली नाही. मात्र, आंबिल ओढ्याकाठच्या काही भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्यापलीकडे फारसे नुकसान झाले नाही.

ड्रेनेज लाईन गाळाने भरल्याने पेठांना बसला फटका; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी​

कात्रज येथील वरच्या तलावात आंबिल ओढा आणि गुजरवाडी येथून येणाऱ्या ओढ्याचे पाणी येते. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर या दोन्ही ओढ्यांना पूर आल्याने कात्रजचा वरचा आणि खालचा असे दोन्ही तलावावरून पाणी वाहिले. त्यातून ओढ्याला पूर आल्याने शहरात हाहाकार उडाला. यावर्षी पावसाळाच्या सुरवातीपासूनच कात्रज तलावातील पाण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाऊस जास्त होऊन देखील त्याचा फटका शहराला बसू शकला नाही.

Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

कात्रज येथील वरचा तलाव हा साडेचार मीटर उंचीचा आहे. या तलावाला लोखंडी गेट आहेत. त्याचा वापर करून यंदा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यात तो वेळोवेळी रिकामा करण्यात आला. तर पेशवे उद्यानात खालचा तलाव आहे. तोही आठ मोठे पाइप टाकून तो रिकामा करण्यात आला होता. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कात्रजचा वरचा तलावातील पाण्याची पातळी जवळपास 2.8 मीटर खाली होती. मात्र, काल दिवसभर झालेल्या विशेषतः रात्री झालेल्या जोरदार पावसाने साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तो भरून वाहू लागला. त्यामुळे आंबिल ओढ्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आले, तरी देखील फार मोठी हानी होऊ शकली नाही. मात्र, अरणेश्‍वर येथील कर्ल्व्हट छोटा असल्याने तेथे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन त्याचा फटका सहकारनगर भागाला बसला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ambil Odha Water management avoided a repeat incidence of September 25th