ड्रेनेज लाईन गाळाने भरल्याने पेठांना बसला फटका; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

शहराच्या गावठाण परिसरातील ड्रेनेज लाइन या पंचवीस ते तीस वर्ष जुन्या आहेत. तक्रार केल्यानंतर तेवढ्या पुरते त्यातील गाळ काढला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षात गावठाण भागातील वाडे पडून इमारती उभ्या राहिल्या.

पुणे : बुधवारी (ता.१५) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा महापालिका यंत्रणेचे वाभाडे काढले. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक ठिकाणच्या सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) गाळाने भरल्या असल्यामुळे पाणी वाहून जाण्याऐवजी घरात पाणी शिरण्याचे प्रकार घडल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागला. 

शहराच्या गावठाण परिसरातील ड्रेनेज लाइन या पंचवीस ते तीस वर्ष जुन्या आहेत. तक्रार केल्यानंतर तेवढ्या पुरते त्यातील गाळ काढला जातो. परंतु गेल्या अनेक वर्षात गावठाण भागातील वाडे पडून इमारती उभ्या राहिल्या. परंतु या ड्रेनेज लाइन पूर्वीच्या आहे तशाच राहिल्या. त्याही गाळाने भरल्या असल्यामुळे सांडपाणी वाहिन्यांची वहन क्षमता संपुष्टात आली आहे. त्यातून हा प्रकार घडला. 

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

दरवर्षी पावसाळापूर्व पावसाळी गटारांची साफसफाई होते. सांडपाणी वाहिन्यांची मात्र होत नाही. तक्रार आली, तर तेवढ्या पुरती कार्यवाही केली जाते. त्यामुळे या लाइन तुंबण्याचे प्रकार वारंवार घडतात. क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर चौकशी केल्यानंतर या तक्रारींचे प्रमाण मोठे आहे. पावसाळ्यात त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण होतात. काल रात्री झालेल्या पावसाने हेच पुन्हा एकदा दाखवून दिले. 

जेंटिंग मशिनचा उपयोग काय 
वास्तविक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर गाळ काढणारी यंत्रणा अस्तित्वात आहे. गावठाणातील रस्ते अरुंद आहेत. तेथे मोठी गाडी जात नाही. म्हणून नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीतून जेंटिंग मशिन खरेदी दिल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हे काम होणे अपेक्षित आहे. त्यांचा वापर करून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या सांडपाणी वाहिन्यातून गाळ काढण्याचे काम केले जात नाही. केवळ मशिनखरेदीमध्येच रस का दाखविला जातो, असे प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. गल्लीबोळ काँक्रिटीकरण करण्याला प्राधान्य देणारे नगरसेवक याकडे कधी तरी लक्ष देत आहेत.

#PuneRains : कोथरूडमध्ये जोरदार पावसाने नाल्यालगतच्या घरात शिरले पाणी; भिंत पडल्याच्या घटना

बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ड्रेनेजमधून पाणी परत फिरल्याने संपूर्ण वाड्यात पाणी शिरले. वारंवार तक्रार करूनही ड्रेनेज लाइनमधील गाळ काढला जात नाही. महिना दोन महिन्यातून एकदा तरी ड्रेनेज लाइन तुंबणे. त्यातून हा प्रकार घडतो. 
- शेखर काटे ( रविवार पेठ)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water to seep into house in Pune city due to drainage jam