वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला | Traffic Issue | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic
वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला

वाहतूककोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला

उंड्री - हांडेवाडी रोड ससाणेनगर रेल्वे गेटवर मागिल आठ दिवसांपासून सायंकाळी प्रचंड वाहतूककोंडी (Traffic) होत आहे. वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहने विरुद्ध दिशेने येत असल्याने वाहतुकीचा (Transport) पुरता बोजवारा उडाला आहे. वाहतूककोंडी रुग्णवाहिका (Ambulance) अडकल्याने रुग्णाचा जीव टांगणीला लागला होता. स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेऊन वाहने बाजूला करत रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. हा प्रकार बुधवारी (दि. १९ डिसेंबर २०२१) रात्री ८ वाजता घडला.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यासाठी आहेत की, फक्त पावत्या करण्यासाठी आहेत, अशी विचारणा केली. नागरिकांची सुरक्षा आणि वाहतूक सुरळीत व्हावी याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्याचे खंडेराव जगताप यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘कोरेगाव भीमा’साठी ‘पीएमपी’कडून मोफत बससेवा

ससाणेनगर रेल्वेगेट ते हांडेवाडी रस्त्यावर वागजाई मंदिरापर्यंत नो एंट्री असूनही अनेक वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहने दामटतात. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गावरील ससाणेनगर रेल्वे गट क्र.७वर हांडेवाडी वाहतूक विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. मात्र, मागिल आठवड्यापासून एकही कर्मचारी या ठिकाणी नसल्यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. महंमदवाडीकडून येणारी वाहने भुयारी मार्गातून न जाता चिंतामणीनगरकडून नो एन्ट्री असताना येतात. त्यामुळे ससाणेनगर रेल्वेगेटपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी होत असल्याचे इम्रान मणियार यांनी सांगितले.

Web Title: Ambulance Got Stuck Traffic Jam Patients Life Was Hanged

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneambulanceTraffic
go to top