तीच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना अमोल कोल्हे यांच्याकडून बळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 11 August 2020

जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी- बोतार्डे येथील ऋतुजा हिने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर ९९.९९ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती.

पुणे : दहावीच्या परीक्षेत ९९.६० गुण मिळवून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जुन्नर तालुक्यातील बोतार्डे- आमलेवाडी येथील ऋतुजा प्रकाश आमले हिचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले. डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तसेच, तीला ऑनलाईन शिक्षण घेता यावे, यासाठी आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'च्या वतीने अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुन्नर तालुक्यातील आदिवासी 'पेसा' क्षेत्रातील आमलेवाडी- बोतार्डे येथील ऋतुजा हिने दहावीच्या परीक्षेची तयारी करताना घराच्या भिंतीवर ९९.९९ टक्के गुण मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार ९९.६० टक्के गुण मिळवून पहिलं स्वप्नं पूर्ण केले. अतिशय गरीब कुटुंबातील ऋतुजा हिच्या गुणवत्तेची दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी तातडीने आपल्या 'जगदंब प्रतिष्ठान'चे विजय कोल्हे, पत्रकार धर्मेंद्र कोरे, अतुल कांकरिया, अतुल आहेर, जयेश कोकणे, शेखर शेटे, आशिष हांडे, तेजस झोडगे आदी सहकाऱ्यांना तीच्या घरी पाठवले. विजय कोल्हे यांच्या हस्ते तीला ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असणारा अॅण्ड्रॉईड मोबाईल भेट देण्यात आला. तसेच, तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ऋतुजा हिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारल्याबद्दल तिच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करीत अशाप्रकारे संवेदनशीलपणे काम करणारा खासदार लोकप्रतिनिधी लाभला, याचा मनस्वी आनंद व्यक्त केला.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, ग्रामीण भागातील विशेषतः बोतार्डेसारख्या आदिवासी क्षेत्रातील हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबातील एक मुलगी कष्टाने शैक्षणिक यश मिळवते, डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचा निश्चय करते, हीच मुळात कौतुकास्पद बाब आहे. अशा गुणवान व आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची मनीषा बाळगणाऱ्या ऋतुजा हिचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करण्याचं भाग्य मला लाभलं, ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amol Kolhe accepted the educational guardianship of a girl from Junnar taluka