‘सवाई’त लघुपट, मुलाखतींचा नजराणा 

‘सवाई’त लघुपट, मुलाखतींचा नजराणा 

पुणे - अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारित ‘षड्‌ज’ हा चित्रमहोत्सव, तसेच ‘अंतरंग’ या ख्यातनाम कलाकारांबरोबरच्या संवादात्मक कार्यक्रमाचा आनंद सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात यंदा रसिकांना घेता येणार आहे. १२ ते १४ डिसेंबर दरम्यान गणेशखिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी १० ते १२ या वेळेत हे कार्यक्रम होणार आहेत. हे दोन्ही कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत, अशी माहिती ‘आर्य संगीत प्रसारक मंडळ’चे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी गुरुवारी दिली. 

दरवर्षी महोत्सवादरम्यान होणारे प्रकाशचित्र प्रदर्शन हे रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असते. या प्रकाशचित्र प्रदर्शनाचे हे सलग अकरावे वर्ष असून, या वर्षी ‘साथसंगत’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारलेले आहे. कोणताही कलाकार हा स्वरमंचावरून एकट्याने कधीच कलेचे सादरीकरण करीत नाही, तर त्यांना दमदार अशी साथ असते साथसंगत करणाऱ्या कलाकारांची. सारंगी, हार्मोनियम, तबला, पखवाज, घटम, व्हायोलिन, ऑर्गन, मृदंगम, टाळ अशा वादकांची साथसंगत मिळते. यातील काही कलावंत मंडळी या वर्षीच्या प्रकाशचित्र प्रदर्शनात आपल्याला भेटणार आहेत. सतीश पाकणीकर यांनी गेल्या पस्तीस वर्षांत या साथसंगतकारांच्या भावमुद्रा आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केल्या आहेत. त्यांच्याच कल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनात उस्ताद अल्लारखाँ, पं. किशन महाराज, पं. सामताप्रसाद, उस्ताद झाकिर हुसेन, पं. अनिंदो चटर्जी, पं. कुमार बोस, पं. अप्पा जळगावकर, पं. तुळशीदास बोरकर, पं. शंकरबापू आपेगावकर, उस्ताद साबीर खान, उस्ताद सरवर हुसेन असे तीन पिढ्यांतील सुमारे नव्वद कलावंत कृष्ण-धवल प्रकाशचित्रातून आपल्याला भेटणार आहेत. महोत्सवाच्या पाचही दिवशी मुख्य मंडपाच्या मागे असलेल्या स्वतंत्र मंडपात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

‘षड्‌ज’ व ‘अंतरंग’तील कार्यक्रम
बुधवार (ता. १२) ः 
    एस. बी. नायमपल्ली दिग्दर्शित पं. विष्णू दिगंबर पलुस्कर हा लघुपट
     चिदानंद दासगुप्ता दिग्दर्शित पं. बिरजू महाराज हा लघुपट 
     मंगेश वाघमारे हे सरोदवादक पं. बसंत काब्रा यांची मुलाखत घेतील
गुरुवार (ता. १३)
     बिजॉय चॅटर्जी दिग्दर्शित गिरिजा देवी यांच्यावरील लघुपट 
     केशव परांजपे हे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांची मुलाखत घेतील 
शुक्रवार (ता. १४)
    ‘जमुना के तीर’ हा अब्दुल करीम खाँ यांच्यावरील लघुपट 
 आरती अंकलीकर-टिकेकर गायिका देवकी पंडित यांची मुलाखत घेतील

बस व्यवस्था 
‘पीएमपीएमएल’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘महोत्सवादरम्यान ‘पीएमपीएमएल’कडून शहराच्या मुख्य भागांतून रसिकांना महोत्सवस्थळापर्यंत नेण्यासाठी व पुन्हा आणण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे. कोथरूड डेपो (पौड रस्ता), वारजे माळवाडी, सिंहगड रस्ता (धायरी), पिंपरी चिंचवड (भक्ती शक्ती चौक, निगडी) या भागातून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे रसिकांना ये- जा करता येणार आहे.’’ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com