... अन्‌ त्यांनी उजळवला "दिवा'!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

बाजारात मिळणाऱ्या एलईडी पणत्या चिनी (मेड इन चायना) अथवा इतर देशांमधून मागविल्या जातात. त्यांची किंमतही जास्त असते. मात्र, ही पणती बनविण्यासाठी आम्हाला केवळ 50 रुपये खर्च आला आहे. अल्पदरात आकर्षक, टिकाऊ आणि पुनर्वापर करता येणारी ही पणती "मेक इन इंडियाचे' एक भाग बनावे, अशी आमची इच्छा आहे.
- अपूर्वा महाले

पुणे - दिवाळीमध्ये मातीच्या पणत्या सजवणे, हा अनेकांचा छंद. विविध रंगसंगती आणि कलात्मकतेतून मनोवेधक पणत्या बनविल्याही जातात. याच सजावटीला तंत्रज्ञानाची जोड देत अपूर्वा महाले आणि प्रियंका चव्हाण या विद्यार्थिनींनी दीर्घकाळ चालणारी आणि पुनर्वापर करता येईल अशी एलईडी दिव्यांची पणती बनविली आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी संस्थेत इन्स्ट्रुमेंन्टल अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या अपूर्वा आणि प्रियंका यांनी महाविद्यालय प्रकल्पांतर्गत ही पणती बनविली आहे. या पणतीमध्ये रेजिस्टरच्या साहाय्याने एलईडी बल्ब बसवला आहे. सेलवर चालणारी ही पणती सुमारे 25 तास सलग चालू शकते. विविध रंगात आणि डिझाइनमधील या पणत्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. अल्पावधीतच नागरिकांकडून या पणत्यांसाठी मोठी विचारणा होऊ लागली आहे.

अपूर्वा म्हणाली, ""महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी काहीतरी वेगळे, पण सर्वसामान्यांना उपयुक्त असे उपकरण बनविण्याची इच्छा होती. अशातच आम्हाला ही कल्पना सुचली. ती प्रत्यक्षात आणणे थोडे अवघड वाटत होते. त्यामुळे प्रा. शीतल कुलकर्णी आणि प्रा. साहिल बेंद्रे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळेच हा प्रयोग यशस्वी करू शकलो.''

Web Title: ....and they burned light