मावळातील आंद्रा धरण भरले 100 टक्के

रामदास वाडेकर
शनिवार, 27 जुलै 2019

मंगरूळजवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. शासनाच्या मावळातील धरणात शंभर टक्के भरलेले सर्वात पहिले हे धरण आहे.

टाकवे बुद्रुक : मंगरूळजवळील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. शासनाच्या मावळातील धरणात शंभर टक्के भरलेले सर्वात पहिले हे धरण आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अंद्रायणी आणि इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आज शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. धरण परिसरात दिवसभरात 153 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.

शाखा अभियंता अनंता हांडे आणि कर्मचारी उमेश यादव यांनी या बाबत माहिती दिली. दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. आता पर्यत ९१२ मिलीमीटर पाऊस पडला असून पाण्याचा साठा 83.30 दशलक्षघन मीटर इतका आहे, त्यापैकी उपयुक्त साठा 82.74 दशलक्षघन मीटर आहे. धरण शंभर टक्के भरले असून पाण्याची पातळी 714.00 मीटर आहे. पाण्याची पातळी वाढली तर धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. आंद्रा धरणातील पाणी अंद्रायणी व इंद्रायणी नदीतून थेट उजनी धरणात पोहचते. या शिवाय तळेगाव औद्योगिक वसाहत, देहू आळंदी तीर्थस्थळासह स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी हे पाणी वापरता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Andra Dam fill 100 percent in Maval