अटकेत असलेल्या 'त्या' वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अडचणी वाढल्या; नवीन प्रकरण आलं पुढे!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

तक्रारदार देखणे हे विविध वयोगटातून महाराष्ट्र संघाकडुन क्रिकेट खेळले आहेत. तसेच ते शहरातील काही शैक्षणिक संस्थामध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करत होते. ​

पुणे : वृद्ध व्यावसायिकाची आर्थिक लूट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक रऊफ शेख याने एका शेअर मार्केट कंपनीच्या कर्मचाऱ्यास बेकायदा अटक करुन त्याला आणि त्याच्या कुटुंबास मानसिक त्रास दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणातही त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- पीएमपी सुरू करण्याबाबत झाला महत्त्वाचा निर्णय; कधी सुरू होणार बससेवा?

खडकी पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात शेख याच्यासह काही जणांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेत नेमणुकीस असताना शेखने वृद्ध व्यावसायिकास एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्याच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली. त्याचबरोबर व्यावसायिकाची महागडी सदनिका जबरदस्तीने स्वत:च्या बहिणीच्या नावावर केली. याबाबतच्या तक्रारीनंतर त्यास अटक करण्यात आली होती.

पुढील सहा महिने घरूनच काम; पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण

दरम्यान, शेख याने आर्थिक गुन्हे शाखेला असतानाच एका प्रकरणामध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्याला बेकायदा अटक करुन त्यास त्रास दिल्याची तक्रार तक्रारदार राहुल देखणे यांनी संभाजी ब्रिगेडच्या आर्थिक आर्थिक विकास परिषदेचे राज्य समन्वयक प्रभाकर कोंढाळकर व शहर उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे दाखल केली आहे. शेख याने आपल्या पदाचा दुरुपयोग करीत, देखणे यांच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीच्या नावाखाली बेकायदेशीरपुणे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

मध्य पुण्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळणार दिलासा? कॉंग्रेसने केली ही मागणी

असे आहे प्रकरण...
तक्रारदार देखणे हे विविध वयोगटातून महाराष्ट्र संघाकडुन क्रिकेट खेळले आहेत. तसेच ते शहरातील काही शैक्षणिक संस्थामध्ये क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करत होते. ऑक्टोबर  2016 मध्ये ते त्यांच्या मामाच्या शेअर मार्केट गुंतवणूक कंपनीमध्ये काम करत होते. संबंधीत कंपनीने त्यांच्या भागधारकांना वेळेत परतावा न दिल्याप्रकरणी कंपनीच्या मालकाला 2014 मध्ये अटकही झाली होती. दरम्यान, 2016 पासून ही कंपनी पुन्हा सुरु झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या भागधारकांना त्यांचे पैसे देण्यास सुरुवात केली होती. पैसे परत करण्यासाठीचे पर्याय सांगण्याचे काम देखणे करीत होते.

दरम्यान, शेख याने 2014 च्या गुन्ह्यात ऑक्टोबर 2016 मध्ये कामाला लागलेल्या देखणे यांना अटक केली. देखणे यांना सोडण्यासाठी शेखने कंपनीच्या मालकाकडे पैशांची किंवा त्या बदल्यात कंपनीच्या मालमत्ता आपल्या नावावर करण्याची मागणी केल्याचे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. त्यानंतर शेखने देखणे यांची बँक खाती गोठविणे, त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणे असे प्रकार केले. याबाबत न्यायालयानेही शेख याच्याविरुद्ध ताशेरे ओढले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"मी संबंधीत कंपनीचा केवळ कर्मचारी असतानाही शेखने मला विनाकारण अटक करुन मला, माझ्या कुटुंबाला त्रास दिला. याबाबत मी प्रकरणी 2017 मध्येच पुणे पोलिसांकडे तक्रार केली, मात्र त्याची दखल कोणी घेतली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी आता पुन्हा तक्रार अर्ज दिला आहे."
- राहुल देखणे, तक्रारदार.

"रऊफ शेख याच्याविरुद्ध राहुल देखणे यांचा तक्रार अर्ज आम्हाला प्राप्त झाला आहे. त्यांना या गुन्हयात खोट्या पद्धतीने अडकवुन मानसिक त्रास दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अर्जाची पडताळनी करुन पुढील चौकशी करू."
- शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another complaint was lodged against senior police inspector Rauf Sheikh at Crimes Branch