बारामतीकरांची चिंता वाढली; कोरोनाचा दुसरा बळी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

माळेगाव (ता. बारामती) येथे शुक्रवारी (ता. 24) आढळलेल्या 60 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

माळेगाव/बारामती (पुणे) : माळेगाव (ता. बारामती) येथे शुक्रवारी (ता. 24) आढळलेल्या 60 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाचा आज पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बारामतीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या दोन झाली आहे. त्यामुळे तालुक्‍यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

माळेगाव येथे शुक्रवारी एक रुग्ण कोरोनाग्रस्त निघाल्याने बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आठवर जाऊन पोहोचली होती. किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या या रुग्णाला 16 एप्रिल रोजी डायलिसिस करण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या वेळेस त्याला कोरोनाची कसलीही लक्षणे नव्हती. मात्र, शुक्रवारी त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याच्या घशातील द्रवाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आज पुण्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

दरम्यान, माळेगाव परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या उद्देशाने बारामतीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या आधिपत्याखाली ग्रामपंचायत प्रशासनाने आवश्‍यक त्या प्रतिबंधात्मक उपयोजना प्रभावीपणे राबवण्यास सुरवात केली आहे. संपूर्ण गावाच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्याबरोबरच निर्जंतुकीकरण फवारण्या केले जात आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे आरोग्य तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कामामध्ये पोलिस प्रशासनासह सरपंच जयदीप तावरे, प्रशांत मोरे, अमिता (अण्णा) तावरे मित्र मंडळ, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे, माजी पंचायत समिती सभापती संजय भोसले आदींनी लक्ष केंद्रित केले आहे. 
 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोडणी कामगार आपापल्या गावात स्थलांतरित झाल्याने आरोग्य तपासणीचा प्रशासनावरील ताण काहीसा कमी झाल्या आहे. असे असले तरी माळेगाव हे तालुक्‍यात सर्वाधिक 40 हजार लोकसंख्येचे गाव आहे. त्यामुळे येथे बारामती शहराच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. 
- राहुल काळभोर
गटविकास अधिकारी, बारामती   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another victim of Corona in Baramati