निम्मा पावसाळा सरल्यावर डास प्रतिबंधक औषधे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

पुणे - पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटल्यानंतर महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे खरेदी करण्याचा मुहूर्त साधला आहे. ही औषधे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

पुणे - पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटल्यानंतर महापालिकेने डास प्रतिबंधक औषधे खरेदी करण्याचा मुहूर्त साधला आहे. ही औषधे खरेदी करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या वाढतो. या डासांमुळे डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांचे रुग्णही वाढतात. दरवर्षी हा अनुभव असूनही वेळेवर महापालिकेचा आरोग्य विभाग कार्यवाही करीत नाही. या वर्षीदेखील जून, जुलै आणि अर्धा ऑगस्ट लोटल्यानंतर डासप्रतिबंधक औषध खरेदीची निविदा स्थायी समितीच्या समोर मंजुरीला ठेवण्यात आली होती. प्रतिकिलो ३ हजार ६०० रुपये दराने अडीच हजार किलो औषध खरेदी केले जाईल. त्याची किंमत ९० लाख रुपये इतकी आहे. 

लालमहाल सुशोभीकरण
लालमहालात मराठा शैलीमध्ये सुशोभीकरण व विविध विकासकामे करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. प्लॅस्टर, रंगकाम, टिकवूड व ऑरनामेंटल टिकवूडचा वापर, नेवासा बेसाल्ट, डेकोरेटिव्ह प्लॅस्टर, लाइम प्लॅस्टर, कौलारू डिझाईनचे छत, नेवासा बायसन पॅनेल सीटच्या माध्यमातून कामे केली जातील. या कामासाठी आर. पी. चित्रोडा यांच्या पंचाहत्तर लाख चोपन्न हजार सातशे रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

अल्प दरात डायलिसिस
येरवडा येथील महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात अल्प दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे. कोठारी चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासगी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून पाच वर्षे हा प्रकल्प चालविण्यासाठी प्रस्ताव मागविले गेले होते.

Web Title: Anti Mosquito Medicines