मांडवगण फराटा येथील रूग्णाच्या किडनी प्रत्यारोपणासाठी मदतीचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील दोन्हीं किडन्या निकामी झालेल्या गणेश घाटे (वय ३१) याच्या किडनी प्रत्यारोपणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन गणेश याची विधवा आई राजश्री घाटे यांनी केले आहे.

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील दोन्हीं किडन्या निकामी झालेल्या गणेश घाटे (वय ३१) याच्या किडनी प्रत्यारोपणासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी असे आवाहन गणेश याची विधवा आई राजश्री घाटे यांनी केले आहे.

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

दहा वर्षांपूर्वी गणेश भानुदास घाटे याच्या दोन्हीं किडन्या निकामी झाल्या होत्या. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे गणेशला किडनीचे ऑपरेशन करणे शक्य नव्हते. अशा वेळेस गणेशला मांडवगण फराटा येथील ग्रामस्थ, मित्र, नातेवाईक, समाजिक, राजकीय, शिक्षण क्षेत्रातील लोकांकडून मदत म्हणून डायलिसिसचा खर्च मिळत गेला. आमदार, खासदार, राजकीय व्यक्तींच्या मदतीने गणेशला पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधी मंजूर झाला. त्यानंतर किडनी च्या ऑपरेशन साठीच्या टेस्ट केल्या तर गणेशला कावीळ असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यामुळे गणेशला त्यावेळी ऑपरेशन करता आले नाही. डिसेंबर २०१० पासून गणेशचे जगणे डायलिसिस वर चालु आहे.

सात ते आठ कोटी डोसची दरमहा निर्मिती - आदर पूनावाला

सुतारकामाचा व्यवसाय करीत असलेले भानुदास घाटे हे गणेशचे वडील चौदा वर्षांपूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने अकाली मृत्यु पावले. त्यानंतर विधवा आई राजश्री या शेवया तयार करणे, पापड बनविणे यांसारखी कामे तसेच खानावळ चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिति हलाखीची असल्याने गणेशवर उपचार करण्यासाठी अनंत अडचणी येत होत्या मात्र छोटीमोठी कामे करून आता पर्यंत त्यांनी आपले कुटुंब चालवले व गणेशचे उपचार ही चालू ठेवले. गणेशच्या किडनी प्रत्यारोपनासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च येणार असून घाटे कुटुंबियांच्या दृष्टीने एवढा पैसा जमविणे आवाक्याबाहेरचे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशचा जीव वाचवण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती घाटे कुटुंबियांनी केली आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appeal for help for ganesh ghate's kidney transplant at mandvagan farata