सफरचंदाचा गोडवा घटला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

काश्‍मीर येथे सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे नुकसान झाले आहे. यामुळे सफरचंदाची काश्‍मीरमधून येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे या सफरचंदाच्या १५ किलोच्या पेटीमागे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रती किलोमागे १० ते ४० रुपये भाव वाढ झाली आहे.

पुणे - काश्‍मीर येथे सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सफरचंदाचे नुकसान झाले आहे. यामुळे सफरचंदाची काश्‍मीरमधून येणारी आवक कमी झाली आहे. त्यामुळे या सफरचंदाच्या १५ किलोच्या पेटीमागे ४०० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रती किलोमागे १० ते ४० रुपये भाव वाढ झाली आहे.  

केंद्र सरकारने काश्‍मीर येथील कलम ३७० हटविल्यानंतर बाजारात काश्‍मिरी सफरचंद साधारणतः दीड ते दोन महिने उशिरा दाखल झाले होते. गेल्या महिन्यापासून काश्‍मीरमधील परिस्थिती निवळली होती. त्यामुळे काश्‍मिरी सफरचंदाची मोठी आवक बाजारात सुरू होती. परंतु मागील चार पाच दिवसांत सातत्याने काश्‍मीर येथे होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक कमी झाली आहे. बर्फवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सफरचंदाची झाडे पडली आहेत. तेथील रस्त्यावर ४-५ फुटांचा बर्फ साचला आहे. मागील आठवड्यात किरकोळ बाजारात या फळाला प्रतिकिलो ७० ते १०० रुपये भाव मिळत होता. मात्र, सध्या भाव वाढून प्रतिकिलो ८० ते १३० रुपये झाला आहे.  

काश्‍मीर येथून मार्केट यार्डात दररोज सफरचंदाच्या १५ ते २० हजार पेट्यांची आवक होत होती. ती घटून ३-४ हजार पेट्यांवर आली आहे. काश्‍मीर येथील दोडा, सोपियान या भागातून ही आवक होत होती. घाऊक बाजारात सफरचंदाच्या १५ किलोच्या पेटीस ६०० ते ९०० रुपये भाव मिळत होता. परंतु बर्फ वृष्टीमुळे ९०० ते १३०० रुपयांपर्यंत गेला असल्याचे मार्केट यार्डातील सफरचंदाचे व्यापारी सुयोग झेंडे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: apple rate increase