पुणे : महापौर, उपमहापौरपदासाठी आज अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेना काय भूमिका घेणार ? हे अजूनही उघड झालेले नाही. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीवरूनही नवी राजकीय समीकरणे आकारला येण्याची चिन्हे आहेत. 

पुणे - पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.18) अर्ज भरण्यात येणार आहेत. भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार आपापले अर्ज भरतील. तर, राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेना काय भूमिका घेणार ? हे अजूनही उघड झालेले नाही. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीवरूनही नवी राजकीय समीकरणे आकारला येण्याची चिन्हे आहेत. 

महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मुदत संपत आल्याने या पदांसाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजपकडे बहुमत असून, या पक्षाचे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडेच आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत भाजपने "व्हीप' काढला आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

भाजपकडून संधी कोणाला? 
महापौरपदासाठी भाजप कोणाला संधी देणार? याची उत्सुकता आहे. मात्र, या पदासाठीच्या उमेदवारांची नावे रविवारी रात्री उशिरा किंवा सकाळी जाहीर करण्यात येईल, असे भाजप नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र, पहिले अडीच वर्ष उपमहापौरपद "आरपीआय'ला दिल्याने आता हेही पद आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी भाजपचेच उमेदवार असतील का ? याचीही उत्सुकता आहे. 

शिवसेनेची संदिग्ध भूमिका 
कॉंग्रेस आघाडीतर्फे महापौर आणि उपमहापौरपदांसाठी उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीकडून महापौर तर कॉंग्रेसकडून उपमहापौरपदाचा उमेदवार दिला जाईल. या निवडणुकांत शिवसेनेची साथ मिळविण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपसोबत राहणार नसल्याचे सांगणाऱ्या शिवसेनेने कॉंग्रेस आघाडीला साथ देण्याबाबतही आपली भूमिका मांडलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: application for today for the post of Mayor Deputy Mayor