खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत कारवाईस मंजूरी

मिलिंद संगई, बारामती
बुधवार, 22 मे 2019

बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे

बारामती : राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व अहिल्यादेवी शेळी विकास मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांना खंडणीची मागणी करणाऱ्या 13 जणांवर मोकाअंतर्गत (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाईस विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. सुहास वारके यांनी मंजूरी दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व सहायक पोलिस निरिक्षक विकास बडवे यांनी ही माहिती दिली. 

बदनामीकारक माहिती सोशल मिडीयावरुन व्हायरल करण्याची धमकी देत पंधरा कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या तेरा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हादाखल केला आहे. या मध्ये सचिन ज्ञानेश्वर पडळकर (रा. पिलीव, पडळकरवस्ती, ता. माळशिरस, सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराज भिसे (रा. खरामळा, ता. शिरुर, जि. पुणे), दत्तात्रय पांडुरंग करे (करेवस्ती, सदाशिवनगर, माळशिरस, सोलापूर), विकास शिवाजी अलदर (आडेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे व बिरुदेव लक्ष्मण कारंडे (दोघेही रा. माळेगाव, ता. माढा, जि. सोलापूर), सुशांत दादासाहेब करे (रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा), दीपक विठ्ठल जाधव (रा. वडजल, ता. माण, जि. सातारा), नितीन राजेंद्र पिसे (रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा), जगन्नाथ जानकर, विनायक मासाळ, रमेश कातुरे  व राजू अर्जुन ( चौघांची पूर्ण नाव माहिती नाही) अशा तेरा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 

या पैकी कोणाविरुध्दही जर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे. या पैकी ज्यांची नावे निष्पन्न झालेली नाहीत असे चौघे वगळता इतर नऊ जणांना पोलिसांनी या पूर्वीच अटक केलेली आहे. 

दरोडेखोरांच्या टोळीलाही मोका
दरम्यान, इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लूटमार करणाऱ्या सोमा राऊत गँगच्या पाच जणांवरही मोका अंतर्गत कारवाईला पोलिस महानिरिक्षकांनी मंजूरी दिली आहे. सोमनाथ उर्फ लाल्या विष्णू राऊत, नितीन बाळू चव्हाण, धनाजी बबन मोरे ( तिघेही रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), दिनेश रविंद्र क्षीरसागर उर्फ डी.के. (रा. उत्तर कसबा, सोलापूर) यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या गँगवर आतापर्यंत विविध पोलिस ठाण्यात 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
राज्यात मोकाची प्रभावी कामगिरी बारामती पोलिस उपविभागाने मोकाअंतर्गत आतापर्यंत आठ प्रस्ताव पाठविले, त्यामध्ये तब्बल 73 जणांवर ही कारवाई झाली. या पैकी 65 जणांना पोलिसांनी अटक केली असून आठ जण फरारी आहेत.  मोकाअंतर्गत झालेली ही उच्चांकी कामगिरी समजली जात आहे. बारामती शहर पोलिस ठाण्याअंतर्गत 45, बारामती तालुका अंतर्गत 20 तर भिगवण पोलिसांकडून तीन व इंदापूर पोलिसांकडून पाच जणांवर कारवाई झाली. 

 

Web Title: Approval is given for action on 13 people demanding the ransom Under Moka