‘स्वीकृत’वरून भाजपमध्ये खदखद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी झालेल्या कोअर कमिटी बैठकीत निवडलेल्या पाच नावांबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य निवडीवरून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू आहे. निष्ठावंतांना डावलून काल-परवा पक्षात आलेल्यांना संधी दिल्यास जोरदार आंदोलन छेडण्याचा इशाराच जुन्या कार्यकर्त्यांनी दिला असून, भोसरीकरांनीही ‘वज्रमूठ’ बनण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे सोमवारी झालेल्या कोअर कमिटी बैठकीत निवडलेल्या पाच नावांबद्दल कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

स्वीकृत सदस्यपदासाठी मंगळवारी (ता. ९) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सत्ताधारी भाजपच्या वाट्याला तीन, तर विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला दोन सदस्य निवडता येणार आहेत. त्यासाठी काही दिवसांपासून कार्यकर्त्यांचे ‘लॉबिंग’ सुरू आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता भाजपची अंतिम तीन नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कळविणार आहेत. ही नावे निवडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पाच नावांची यादी शहर भाजपकडे मागितली होती. त्यासाठी सोमवारी सकाळी चिंचवडला कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात पाच जणांची नावे निवडण्याचे अधिकार शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांना होते. त्यांनी पाच नावे निवडून मुख्यमंत्र्यांना कळविले असून, नावांबाबत गुप्तता पाळली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीत डावललेल्यांना स्वीकृतपदासाठी संधी द्या, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे तिकीट कापलेल्यांना स्वीकृतपदावर संधी मिळेल, अशी आशा आहे. मात्र, पुन्हा तोंडाला पाने पुसल्यास स्वस्थ बसणार नाही, असा पवित्राच जुन्यांनी घेतला आहे. भोसरीतून योगेश लांडगे व संतोष लांडगे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तसे न झाल्यास भोसरीकर महापालिकेतच आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. 

संभाव्य नावे मुख्यमंत्र्यांकडे?
स्वीकृत सदस्यांच्या संभाव्य यादीत अमर मूलचंदानी, सदाशिव खाडे, योगेश लांडगे, मोरेश्‍वर शेडगे व सारंग कामतेकर अशी पाच नावे मुख्यमंत्र्यांना कळविली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. यातीलच अंतिम तीन नावे मुख्यमंत्री कळवतील. 

प्रमुख पदाधिकारी गैरहजर
स्वीकृत सदस्यत्वाची नावे निवडण्यासाठी झालेल्या कोअर कमिटी बैठकीस खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे हे प्रमुख अनुपस्थित होते. त्यामुळे भाजपमध्ये जुन्या-नव्यांचा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. 

राष्ट्रवादीकडून २९ इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेसला दोन स्वीकृत सदस्य निवडायचे आहेत. मात्र, त्यांच्याकडे तब्बल २९ जण इच्छुक आहेत. सोमवारी संध्याकाळी इच्छुकांची नावे पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांना पाठविण्यात येणार आहेत. ते अंतिम दोन नावे मंगळवारी सकाळी ११ पर्यंत कळवतील. राष्ट्रवादीच्या प्रमुख दावेदारांमध्ये भाऊसाहेब भोईर, विजय गावडे (चिंचवड), नीलेश पांढारकर, प्रसाद शेट्टी (पिंपरी) व अरुण बोऱ्हाडे, संजय वाबळे आणि जालिंदर शिंदे (भोसरी) यांचा समावेश असल्याचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी सांगितले.

Web Title: approved corporator issue in bjp