मुलासाठी फौजी लढतोय अन्‌ रडतोयही!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

पुणे - फौजी... फौजी... म्हणत आपण सगळे जण मोठ्या अभिमानाने ‘इंडियन आर्मी’चे गुणगान करतो. पुणे तर लष्कराचे दक्षिण मुख्यालय. अनेक पराक्रमी अधिकाऱ्यांचे वास्तव्य असलेले शहर. पण, याच शहरात एक फौजी आपल्या सात वर्षांच्या पिलाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गेली आठ दिवस एकाकी ‘लढत’ होता अन्‌ रडतही होता. 

काश्‍मीरमधल्या गुलमर्ग येथे ‘ड्यूटी’ करणाऱ्या सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) हा सैनिक. वजा दहा अंश सेल्सिअस तापमानात, बर्फामध्ये पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणारा हा जवान. 

सीमेवर सातत्याने होणाऱ्या ‘फायरिंग’मुळे सुटी मिळणे अवघड. कशीबशी दहा दिवस सुटी घेऊन हा जवान कोल्हापूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी आला. घरी येताच पिलाला आपल्या छातीशी कवटाळत तो म्हणाला, ‘‘मी आलोय तुला काही होऊ देणार नाही.’’

या फौजीने मुलाच्या उपचारांसाठी पुणे गाठले. सुरवातीला ससून रुग्णालयात आला. तेथे ‘वेटिंग लिस्ट’ होती. पण, फौजीला परत ‘ड्यूटी’वर जायचे असल्याने त्याची पावले खासगी रुग्णालयाकडे वळली. ‘सेंट्रल गव्हर्न्मेंट हेल्थ स्किम’मधून (सीजीएचएस) ही शस्त्रक्रिया करता येणार होती. त्यासाठी त्याने कागदपत्रांची जुळवाजुळव केली. पुण्यातील कर्वे रस्त्यावरील रुग्णालयात तपासण्या झाल्या. तेथे ऑपरेशन करण्याचे ठरले. मुलाला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केले. पण, त्या वेळी ३५ हजार रुपये भरण्याचे फर्मान रुग्णालय प्रशासनाने सोडले. ‘सीजीएचएस’मधून पैसे मिळणार असूनही हे जास्तीचे पैसे का, या फौजीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की ‘‘ऑपरेशनसाठी ७० ते ८० हजार रुपये खर्च येणार आहे. ते तुमचे ३५ हजार रुपयांमध्ये करत आहोत.’’ 

या उत्तरावर कोणताही प्रश्‍न न करता फौजी परत गावी आला. चार-पाच दिवसांमध्ये पैशाची जुळवाजुळव केली. जमा झालेले २५ हजार रुपये घेऊन तो परत रुग्णालयात आला. रुग्णालयाने २० हजार रुपये जमा करून घेतले. त्याच्या मुलाचे ऑपरेशन आता झाले आहे. त्याची प्रकृतीही सुधारत आहे. पण, आता फौजी मात्र राहिलेली रक्कम उभारण्यासाठी ‘लढत’ आहे.

...अन्‌ तो मनोमन कोसळला
‘‘तुम्ही ऑपरेशन करा मी पैसे भरतो. मी फौजी आहे. तुमचे सगळे पैसे देतो. पण, जास्तीचे पैसे घेऊ नका.’’ या फौजीच्या वाक्‍यावर प्रशासनाचा कारभार सांभाळणारे डॉक्‍टर म्हणाले, ‘‘तू कोण आहेस हे सांगू नकोस, पैसे भर आणि मुलाचे ऑपरेशन कर.’’ शत्रूचा अचूक वेध घेणारा हा जवान या वाक्‍याने मनातून कोसळला. त्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. अखेर, दुसऱ्या एका डॉक्‍टरांच्या मध्यस्थीने त्याला तात्पुरता दिलासा मिळाला.

Web Title: army jawan child treatment hospital heart surgery life