बारामती सराईत टोळी जेरबंद

शेतकऱ्यांनी केले पोलिस कारवाईचे स्वागत
Gang Arrest.
Gang Arrest.sakal

माळेगाव - घरफोड्यासह शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप व शेती अवजारे चोरी प्रकरणातील सक्रिय असणाऱ्या सराईत टोळीला बारामती तालुका पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती आज पुढे आली. अक्षय बाळासाहेब हुले (वय 26), अक्षय लक्ष्मण घोलप  (वय 19), अभिषेक दत्तात्रय गावडे (वय 19, सर्व रा. मेडद ता. बारामती ), संतोष जगन्नाथ खांडेकर ( वय 37, रा. जळगाव क. प. ता. बारामती) हे वरील गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अनेक दिवस तालुक्याच्या ग्रामीण भागात चोऱ्यांच्या माध्यमातून वरील गुन्ह्यातील आरोपींनी धुमाकूळ घातला होता. परंतु आता हे टोळके पकडले गेल्याने विशेषतः शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, तर काही शेतकऱ्यांनी थेट पोलिसांच्या कामगिरीची स्वागत केले. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार राम कानगुडे, पोलिस नाईक रणजीत मुळीक, अमोल नरुटे, प्रशांत राऊत या कर्मचाऱ्यांनी वरील कामगिरी यशस्वी केल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप, शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. शिवाय घरफोड्यांसह मोटारसायकली चोरीला जाण्याच्या घटनाही वाढल्या होत्या. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यामध्ये तब्बल १४ गुन्हे दाखल झाले होते. त्या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली होती. या प्राप्त स्थितीचा विचार करून पोलिस निरिक्षक श्री. ढवाण यांनी वरील गुन्ह्यातील चोरांना पकडण्याचे आव्हान स्वीकारले होते. त्यानुसार पोलिसांनी गुरूवार (ता. २६ मे) रोजी वरील आरोपी पकडले.

दरम्यानच्या कालावधीत संबंधित आरोपींकडे तपास केला असता त्यांनी कऱ्हावागज, मेडद, माळेगाव, गोजुबावी, सोनगाव, पारवडी आदी भागात चोऱ्या केल्याचे उघड झाले. तसेच सदरच्या वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आरोपी अभिषेक गावडे यांच्या मालकीचा टेम्पो वापरत असल्याचे निदर्शनात आले. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी तालुका पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com