अटलजींचे स्वप्न पूर्ण झाले - राम नाईक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून एकसंध भारत बनविण्याचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही मात्र, त्यांच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत हे कलम हटविण्यात यश आले आहे. यामुळे त्यांच्या पश्‍चात का होईना त्यांचे हे कलम हटविण्याबाबतचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी भावना माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केली.

पुणे - जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून एकसंध भारत बनविण्याचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्वप्न होते. त्यांच्या हयातीत ते पूर्ण होऊ शकले नाही मात्र, त्यांच्या निधनानंतर एक वर्षाच्या आत हे कलम हटविण्यात यश आले आहे. यामुळे त्यांच्या पश्‍चात का होईना त्यांचे हे कलम हटविण्याबाबतचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अशी भावना माजी राज्यपाल व भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केली.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त रविवारी लोकमान्य टिळक विचार मंचच्या वतीने ‘आठवणीतील अटलजी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी राम नाईक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आणि खासदार गिरीश बापट यांची मुलाखत घेतली. त्या वेळी मुलाखतीत नाईक बोलत होते. या कार्यक्रमात या तिन्ही वक्‍त्यांनी वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. महापौर मुक्ता टिळक, शैलेश टिळक या वेळी उपस्थित होते. 

नाईक म्हणाले, ‘‘अटलजी पंतप्रधान असताना त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव आला होता. त्या वेळी सहकारी या नात्याने मी त्यांना सरकार टिकविण्यासाठी खासदारांच्या फोडाफोडीचा प्रस्ताव दिला; परंतु माझ्या या प्रस्तावावर ते प्रचंड संतप्त झाले. सरकार पडले तरी चालेल; पण आर्थिक आमिषाच्या माध्यमातून एकही खासदार फोडणार नाही, त्याऐवजी परत जनतेसमोर जाऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.’’ 

‘अटलजी संयमी, शांत, मितभाषी आणि अभ्यासपूर्वक व विचारपूर्वक बोलणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या विचारात मोठी परिपक्वता होती. त्यामुळे त्यांनी कधीही उथळ निर्णय घेतला नाही. याची प्रचिती मी अनेकदा घेतली,’’ असे डॉ. काकोडकर यांनी सांगितले. मुक्ता टिळक यांनी प्रास्ताविक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article 370 Dream atal bihari vajpayee Ram naik