प्रज्ञावंताची अलौकिक जीवनगाथा

ज्योत्स्ना भोळे सभागृह (हिराबाग) - ‘लौकिक-अलौकिक’ या कार्यक्रमात अभिवाचन करताना ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष.
ज्योत्स्ना भोळे सभागृह (हिराबाग) - ‘लौकिक-अलौकिक’ या कार्यक्रमात अभिवाचन करताना ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती सुभाष.

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या लेखनावर आधारित ‘लौकिक-अलौकिक’ या कार्यक्रमाचा अनुभव कमालीचा अंतर्मुख करायला लावणारा होता. रंगमंचावर अभिवाचन करायला बसलेल्या ज्योती सुभाष व माधुरी पुरंदरे या कसलेल्या रंगकर्मींबरोबर नव्या पिढीचा कलावंत हर्षद राजपाठक होता. दोन पिढ्यांचा हा सेतू दिग्दर्शक-अभिवाचक उमेश कुलकर्णी यांनी योजला होता. ढेरे यांच्या साहित्याचा वाचक दोन्ही पिढ्यांमध्ये आहे, याचेच हे प्रतीक. 

हिराबागेतील जोत्स्ना भोळे सभागृहात झालेल्या या चिरस्मरणीय कार्यक्रमात वरील चौघा कलावंतांनी ढेरे या प्रज्ञावंताच्या संशोधन साहित्यकृतींमधील निवडक अंश लयबद्ध, धीरगंभीर वाचनातून जिवंत केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू उघडणाऱ्या सुहृदांच्या कथनातील झलकही उताऱ्यांमधून दाखवली. ढेरेंच्या भगिनीच्या लेखनातून त्यांच्या बालपणीचा काळ ऐकताना मन कातर झाले. डॉ. तारा भवाळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून ढेरेंच्या कलासक्त व ज्ञानासक्त वृत्तीची दुपेडी वीण मोहवून टाकत होती. नरहर कुरुंदकरांसारख्या वास्तवदर्शी, विचारवंत साहित्यिकाने करून दिलेल्या परिचयातून ढेरेंचा परंपरा व परिवर्तनाची विवेकी सांगड घालण्याचा विरळा गुणधर्म कळला. स्वत: ढेरे यांच्या लेखनातील पुढील ओळी शेवटी त्यांच्यापुढे नतमस्तक करायला लावणाऱ्या ठरल्या. ‘मी एक खेळ मांडला. भान विसरून तो खेळत राहिलो. खेळही असा, की स्वतःचं भान विसरल्याशिवाय तो खेळताच येत नाही. ज्ञानब्रह्मापुढे सर्वस्वाची आहुती दिली.’ 

या अभिवाचनातील भावछटांमध्ये कल्याणी देशपांडे यांनी सतारीवर वाजवलेल्या यमन, झिंझोटी, मांड, दुर्गा, पहाडी, शुद्ध सारंग, जयजयवंती, रागेश्री व दरबारी रागांमधील सुरावटींमुळे गहिरेपणा आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com