‘मृत्यु’मार्गाला थोपविण्यासाठी हवा ‘सेवा’ रस्ता

संभाजी पाटील
Monday, 12 October 2020

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू, ही एका रस्त्यावरील झलक आहे. विकासाच्या गप्पा किंवा खड्ड्यांच्या सेल्फीचे राजकारण करणाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवतीचा असा एक रस्ता दाखवावा, जो सुरक्षित आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नियोजनातच बदल करावा लागेल. रस्ता करताना प्रथम सेवा रस्त्यालाच प्राधान्य द्यावे लागेल; अन्यथा मृत्यूचे आकडे मोजण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही.

पुणे - कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील अपघात आणि त्यातून होणारे मृत्यू, ही एका रस्त्यावरील झलक आहे. विकासाच्या गप्पा किंवा खड्ड्यांच्या सेल्फीचे राजकारण करणाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवतीचा असा एक रस्ता दाखवावा, जो सुरक्षित आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नियोजनातच बदल करावा लागेल. रस्ता करताना प्रथम सेवा रस्त्यालाच प्राधान्य द्यावे लागेल; अन्यथा मृत्यूचे आकडे मोजण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराचा गेल्या १० वर्षांत चारही बाजूंनी झपाट्याने विकास झाला. पूर्वी शहराबाहेर असणारे राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग शहराचे भाग बनले. या महामार्गांना पर्यायी मार्ग निघाले नाहीत. त्यामुळे १० टनांची माल वाहतूक करणारा ट्रक असो किंवा वारज्याहून पुण्याच्या मध्यवस्तीत नोकरीसाठी येणारा दुचाकीचालक असो, सर्वांना एकच रस्ता वापरावा लागतो. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर जा किंवा नगर रस्त्यावर सर्व वाहनांची, पायी चालणाऱ्यांची जीवघेणी सरमिसळ पाहायला मिळेल. सहाजिकच या मार्गावर होणारा कोणताही अपघात जिवावरच 
उठवतो. 

पीएमपीच्या 600 बस रस्त्यावर; उत्पन्न पोचले 30 लाखांवर 

कात्रज ते नवले पूल या मार्गावर नुकत्याच झालेल्या अपघातात ट्रकने १३ वाहनांना उडविले. ही या आठवड्यातील घटना; पण या तीन किलोमीटरच्या परिसरात वर्षभरात ३८ अपघात झाले. त्यात १९ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांकडे नोंद नसलेले किरकोळ अपघात शेकड्यांमध्ये असून, जखमींनी बरे होण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. 

कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्ग तीन खासदारांच्या हद्दीतून जातो. केंद्र सरकारचा लाडका जावई असल्याच्या थाटात कार्पोरेट जगतावर राज्य करणाऱ्या ठेकेदाराकडे कित्येक वर्षे हे काम प्रलंबित आहे. पण त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत ना केंद्राने दाखविली ना राज्य सरकारने.

कर्करोगाचा धोका ओळखता येणार; पुण्यातील तज्ज्ञांचे संशोधन

महापालिकेने त्यांच्या ताब्यात असणाऱ्या भागावरील सर्व्हिस रोडला कधीच प्राधान्य दिले नाही. त्या सर्वांचा फटका सर्वसामान्य नागरिकांना दररोज बसत आहे. या रस्त्यावरून बाहेर पडलेला आपला मुलगा किंवा मुलगी रात्री घरी येईपर्यंत कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागलेला असतो. कात्रज-कोंढवा-मंतरवाडी या रस्त्याची परिस्थिती तर आणखीनच भयावह आहे. 

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा फटका या कामाला बसला आहे. कात्रज ते खडी मशिन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर रस्त्यासाठी २२५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ७० टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याचे सांगितले जाते, पण राजकारणाचा अड्डा बनविलेल्या या रस्त्याच्या कामाची दोन वर्षांपूर्वी सुरवात होऊन कोणतीही प्रगती नाही. पुढे याच रस्त्याचे बिल सार्वजनिक बांधकाम विभागाने थकविले म्हणून ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले, या रस्त्यावरही दररोज तीन ते चार अपघात 
होतात. 

दहावी-बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांपुढे पेच

महापालिका, सार्वजनिक बांधकाम, रस्तेविकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) या यंत्रणांमध्ये कोणताच समन्वय नाही. लोकप्रतिनिधींचा या यंत्रणांवर वचक नाही. त्यामुळे शहराभोवतीचे हे ‘मृत्युमार्ग’ दुरुस्त करण्याची जबाबदारी कोणाची, हे निश्‍चित व्हायला हवे. राजकारण करणाऱ्यांच्या ‘सेल्फी’ नागरिकांनीच काढून विकासकामांत अडथळे आणणाऱ्यांना कायमचे ‘डिलीट’ करायला हवे.

याला हवे प्राधान्य 

  • सर्व्हिस रस्त्यांची कामे प्राधान्याने करावीत.
  • सेवा रस्त्यांच्या भूसंपादनासाठी राखीव निधी. 
  • महामार्गावर खड्डे आणि दुरुस्तीच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा. 
  • रस्त्याशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधणारा अधिकारी. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sambhaji patil on katraj dehuroad service road