पाऊस नव्हे पुण्यातील नियोजन ‘अवकाळी’

पाऊस झाला की शहरातील कोणत्याही रस्त्यावर ही परिस्थिती पहायला मिळते.
पाऊस झाला की शहरातील कोणत्याही रस्त्यावर ही परिस्थिती पहायला मिळते.

तासभर पाऊस पडला तरी रस्त्यांवर पूर आल्याची परिस्थिती होणे हे महानगर आणि ‘स्मार्ट सिटी’ असणाऱ्या पुण्याला नक्कीच शोभनीय नाही. शहरातील पाणी वाहून नेणारे सर्व नैसर्गिक स्रोत, रस्ते, महापालिकेचे पावसाळी गटार, सांडपाणी व्यवस्था यांचे एकत्रित ऑडिट करण्याची वेळ आता आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘शहरात सिमेंटचे रस्ते केल्याने पाणी मुरण्यास जागा शिल्लक राहिली नाही’, ‘स्ट्रॉम वॉटर यंत्रणा नसल्याने पाणी रस्त्यावर येते’, ‘महापालिका गटारे साफ करण्याचे टेंडर काढून केवळ बिले काढते; प्रत्यक्षात कामच होत नाही’, ‘एवढा पाऊस एकदम झाल्यानंतर हीच अवस्था होणार’, ‘शहरातून वाहणारे ओढे-नद्या-नाले बुजविले, त्याच्यावर अतिक्रमणे झाल्याने त्यांची वहन क्षमता संपली आहे...’, ही किंवा अशी कारणे आपण दर पावसाळ्यात ऐकतो. नागरिक आगपाखड करतात, पाण्याने उद्‌ध्वस्त केलेले संसार कायमचे रस्त्यावर येतात, महापालिकेची यंत्रणा अत्यंत तात्पुरती कामे करते आणि पुन्हा पावसाळा येतो. पाणी रस्त्यावर येते, अनेकांचे जीव जातात, पण चर्चा तीच राहते. एखादी आपत्ती आली की त्यातून काहीतरी शिकावे. अशी परिस्थिती पुन्हा होणार नाही, यासाठी उपाययोजना व्हाव्यात ही अपेक्षा असते. पण, पुण्यात असे काहीही होताना दिसत नाही.

दोन वर्षांपासून सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये जोरदार पाऊस होत आहे. पण इतरवेळीही अर्धातास जरी पाऊस झाला तरी केवळ उताराच्या भागातच नव्हे तर सरसकट पाणी रस्त्यावर येते. दुभाजकांमुळे पाणी आडून राहाते. सिंहगड, कर्वे, नगर, सातारा, शिवाजी रस्ता किंवा शहरातील असा एकही महत्त्वाचा रस्ता नाही जेथे कितीही पाऊस आला तरी पाणी साचले जात नाही. प्रत्येक रस्त्यावर सांडपाणी वाहून जाणारी यंत्रणा उभारणे सक्तीचे असताना ती उभारली गेली नाही. प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवणारे किंवा प्रत्येक काम आपल्या मर्जीतील ठेकेदारालाच मिळावे यासाठी तत्पर असणारे नगरसेवक अशी कामे होत असताना गप्प कसे असतात. शहरात सिमेंटच्या रस्त्याचे जाळे उभारताना स्ट्रॉम वॉटर लाईनसह सेवा लाइन वेगळी असेल अशी निविदांमध्ये अटच होती. पण आजही अनेक रस्त्यांवर अशा लाइन टाकल्याच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेने किती रस्त्यांवर स्ट्रॉम वॉटर लाइन टाकल्या, त्या किती वहन क्षमतेच्या आहेत, त्याच्यातील ‘गाळ’ किती वेळा काढला, हे जाहीर करायला हवे. खरेतर महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच याची माहिती आपल्या वेबसाइटवर किंवा क्षेत्रीय कार्यालयात स्वतःहून जाहीर करायला हवी. 

पेठांच्या भागात स्ट्रॉम वॉटर लाइन नसतील तर त्याठिकाणी साठणाऱ्या पाण्याचा निचरा कसा होणार?, याचा स्वतंत्र विचार करायला हवा. आंबिल ओढा, नागझरी नाला, भैरोबा नाला या शहरातील सर्वांत मोठ्या ओढ्यांचा गाळ दरवर्षी काढला जातो, त्याचे खोलीकरण केले जाते, त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. हा गाळ कधी काढला जातो, उपसून तो कोठे टाकला जातो, त्याचे मोजमाप कोण करते यासाठी त्रयस्थ यंत्रणा नेमायला हवी. या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये झालेली अतिक्रमणे हटवायला हवीत. महापालिकेने दहा वर्षांपूर्वी शहरातील सर्व ओढे-नाले, ओघळ यांचे सर्वेक्षण केले. त्या अहवालाचा दुरुपयोग करून बांधकाम व्यावसायिकांना बाणेर, बालेवाडी, कोथरूड भागात नैसर्गिक स्रोत वळविण्याची परवानगी दिली. त्याचे परिणाम आज भोगावे लागत आहेत. 

ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्व नैसर्गिक स्रोत, ड्रेनेज, स्ट्रॉम वॉटर, रस्त्यावरील पाणी साचणाऱ्या जागा यांचे एकत्रित ऑडिट करावे. पुढच्यावर्षी ही परिस्थिती राहणार नाही, यासाठी तत्काळ उपाययोजना करायला हव्यात. 

या गोष्टी करा 

  • नैसर्गिक स्रोतांचे सर्वेक्षण 
  • स्ट्रॉम वॉटर, ड्रेनेजचे ऑडिट
  • दुभाजकांमुळे पाणी साचणाऱ्या जागांची दुरुस्ती 
  • कोणत्या कामासाठी किती निधी खर्च केला?, हे जाहीर करणे 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com