NEET Result 2020: 'नीट'मध्ये महाराष्ट्राचा नंबर खालून दुसरा; काय आहेत कारणे?

NEET
NEET

पुणे : वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत (नॅशनल इलिबीजीटी एंटरन्स टेस्ट-नीट) महाराष्ट्राचा निकाल 40.94 टक्के इतका लागला आहे. सव्वादोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील 147 पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 79 हजार 974 इतकी आहे. टक्‍केवारीच्या प्रमाणात महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवर खालून दुसरा नंबर लागत आहे. तर पहिला नंबर नागालॅंडचा आहे.

2015 पासून वैद्यकीय प्रवेशासाठी 'नीट' परीक्षा अनिवार्य केली आहे, त्याआधी महाराष्ट्रात 'सीईटी'च्या माध्यमातून प्रवेश निश्‍चित केले जात होते. 'नीट'मध्ये दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ, तेलंगणा, तमिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांचा दबदबा आहे. पहिल्या 50 टॉपमध्ये या राज्यांचे पाच पेक्षा जास्त विद्यार्थी चमकले आहेत. देशभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थ्यांनी 'नीट'साठी नोंदणी केली होती, पण प्रत्यक्षात निकालाच्या टक्केवारीत उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या कमी आहे. 2019 आणि 2020च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

2019 मध्ये महाराष्ट्रातून 2 लाख 16 हजार 176 जणांनी अर्ज केला, त्यापैकी 2 लाख 6 हजार 745 जणांनी परीक्षा दिली. त्यातील 39.26 टक्‍के म्हणजेच 81 हजार 171 विद्यार्थी पात्र ठरले. 2020 च्या निकालात दीड टक्‍क्‍यांनी सुधारणा झाली आहे. 2 लाख 27 हजार 659 जणांनी नोंदणी केली, त्यापैकी 1 लाख 95 हजार 338 जणांनी परीक्षा दिली. 79 हजार 974 जण उत्तीर्ण झाले, या निकालाची टक्केवारी 40.94 इतकी आहे. पहिल्या 50मध्ये राज्यातील चार विद्यार्थी आहेत. त्यापैकी दोघांनी राज्याबाहेर तयारी केली आहे. सर्वांत शेवटचा नंबर असलेल्या नागालॅंडमध्ये 2 हजार 3356 विद्यार्थ्यांपैकी 1 हजार 805 जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी 40.50 टक्‍के म्हणजे 731 जण उत्तीर्ण झाले आहेत.

पिछाडीची ही आहेत प्रमुख कारणे :
- 'नीट'च्या तयारीला उशिरा सुरवात
- महाविद्यालयांकडून तयारीचा अभाव
- 'सीईटी' पॅटर्नप्रमाणे 'नीट'चा अभ्यास
- क्रॅशकोर्सवर विद्यार्थी अवलंबून

"महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे, पण 'नीट'च्या तयारीला उशिरा सुरवात केली जाते. त्या तुलनेत इतर राज्यांमध्ये या परीक्षांचा अभ्यास लवकर सुरू होतो. इयत्ता 11वी मध्येच या 'नीट'चा अभ्यास सुरू करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र बोर्डाने इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. त्यामुळे पुढील काळात महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू शकते.''
- रवींद्रसिंह परदेशी, प्राचार्य, फग्युर्सन महाविद्यालय

"गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्राचा निकाल थोडा वाढला आहे, पण दिल्ली, राजस्थान यासह इतर राज्यांची टक्केवारी आपल्यापेक्षा जास्त आहे. 2015 पासून 'नीट' सुरू झाली, पण महाराष्ट्रात अद्यापच 'सीईटी'च्या पद्धतीने अभ्यास केला जात आहे. 'नीट'ला अभ्यासक्रम दुप्पट आहे, अवघड आहे, शिवाय निगेटिव्ह गुण आहे, त्यामुळे क्रॅश कोर्सद्वारे उत्तीर्ण होता येणार नाही. त्यासाठी पूर्ण दोन वर्ष तयारी करावी लागेल.''
- दुर्गेश मंगेशकर, संचालक, आयआयटीएन्स प्रशिक्षण केंद्र

2020 चा काही प्रमुख राज्यांचा निकाल :

राज्य टक्‍केवारी (कंसात 2019 टक्केवारी) उत्तीर्ण विद्यार्थी संख्या
महाराष्ट्र     40.94 (39.26) 79974
आंध्रप्रदेश  58.63 (70.72) 33841
बिहार 55.79 (57.61) 46332
दिल्ली     75.40 (74.92) 23554
गुजरात 56.18 (46.36) 36398
हरियाना 72.90 (73.41) 22395
कर्नाटक 61.56 (63.25) 55009
केरळ 63.94 (66.59) 59404
राजस्थान 68.68 (69.66) 65758
देशाचा निकाल 56.44 (56.50) 7,71,500

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com