मुखपट्टी ही जुलमी गडे...!

Panchnama
Panchnama

‘अहो, असं वेंधळ्यासारखं इकडे-तिकडे काय बघताय? लक्ष कुठे आहे तुमचं? आपण बायकोसोबत शॉपिंगला आलोय, तेवढं तरी लक्षात ठेवा. त्या बाईकडे टक लावून काय बघताय?’’ तुळशीबागेतील गर्दीत प्रमिलाताई दूर अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला झापत होत्या.

‘लॉकडाउनमुळे कित्येक महिन्यांनी शॉपिंगला मी घराबाहेर पडले. घरी यायला लवकर रिक्षा मिळत नाही. शिवाय एवढं ओझं वाहायचं कोणी म्हणून या बाबाला बरोबर घेतलं तर याचं लक्ष दुसऱ्यांच्याच बायकांकडे. मी सोबत असताना ही तऱ्हा! मी नसेल तर काय करत असेल? मी म्हणून टिकले, दुसरी कोणी असती तर कधीच पळून गेली असती.’’ गिरणीचा पट्टा चालावा, तसा प्रमिलाताईंचा तोंडाचा पट्टा चालू होता; पण ती व्यक्ती मात्र आपण त्या गावचेच नाही, असा चेहरा करून दुकानात शिरलेल्या एका महिलेवर लक्ष ठेवून होता. आपण एवढे बोलतोय, तरी पलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रमिलाताईंचा पारा आता चांगलाच वाढला. त्या माघारी वळल्या व त्या व्यक्तीजवळ आल्या. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? लक्ष कुठंय तुमचं आणि सामानाच्या पिशव्या कुठे आहेत? का वेंधळ्यासारख्या हरवल्या.’’ प्रमिलाताईंनी आवाज चढवला. ही महिला आपल्याशी बोलतेय, याची जाणीव झाल्याने तो पुरुषही आवाज चढवून म्हणाला, ‘‘ओ बाई, एवढं आवाज चढवून बोलायला मी काय तुमचा नवरा आहे का?’’ असे म्हणून त्याने चेहऱ्यावरील मास्क अर्थात मुखपट्टी काढली. त्यावर प्रमिलाताई एकदम नरमल्या. 

‘सॉरी ! बरं का!’’ आमच्या यांनी देखील तुमच्यासारखेच कपडे आणि मास्क घातला होता म्हणून माझा गैरसमज झाला.’’ तेवढ्यात त्या पुरुषाची बायको दुकानातून बाहेर आली. आपल्या नवऱ्याशी एक अनोळखी बाई प्रेमाने बोलतेय आणि वर ‘सॉरी’ही म्हणतेय, हे पाहून तिने नवऱ्याकडे पाहून दातओठ खाल्ले. पुढचा प्रसंग टाळण्यासाठी तिच्या नवऱ्याने तिला सगळा प्रकार उलगडून सांगितला.

तेवढ्यात प्रमिलाताईंचा नवरा सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत तिथे पोचला. ‘‘अहो, कुठं हरवला होतात? तुमच्या एकसारख्या मास्कमुळे केवढं रामायण झालं!’’ असं म्हणून झालेला प्रकार पुन्हा सांगितला. आता त्या चौघांची चांगलीच गट्टी जमली. 

‘अहो, या मास्कमुळे कोणता प्रसंग गुदरेल काय सांगता येत नाही. त्यात आमचे हे इतके वेंधळे आहेत, की हे दरवेळी नवा गोंधळ घालतात. आता मागच्याच आठवड्यात मी यांच्यासाठी चांगली खीर केली होती. त्यावर त्यांनी तक्रार केली, की ‘अगं ही कसली खीर आहे. फक्त दूधच तोंडात जातंय आणि तांदूळ मात्र वाटीतच राहतंय.’ मी यांच्याकडे पाहिले तर हे मास्क लावून खीर खात होते. ‘अहो, खीर खाताना किमान मास्क तरी काढा’, असं मी 
म्हटलं. 

त्यावर प्रमिलाताईंचा नवरा खजील झाला व हळू आवाजात म्हणाला, ‘‘अगं आताचा प्रसंग तुझ्या वेंधळेपणामुळे घडला ना. मग माझं उदाहरण देऊन माझी कशाला बदनामी करतेस.’’ मात्र, यावर प्रमिलाताईंनी केवळ डोळे वटारले. 

‘नाही तू म्हणतेस तेच बरोबर आहे. मीच वेंधळा आहे. आतासुद्धा माझीच चूक आहे. मी असला मास्क घालायलाच नको होता. सॉरी. अगदी मनापासून सॉरी.’’ त्यावर मात्र प्रमिलाताईंची कळी खुलली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com