नववर्षासाठी हवा आरोग्यदायी संकल्प

धनंजय बिजले
Sunday, 27 December 2020

सरत्या वर्षाच्या कटू आठवणी विसरायच्या असतील, तर नव्या वर्षासाठी काही संकल्प आवर्जून केले पाहिजेत. राज्य शासन व महापालिकेने शहराच्या पायाभूत आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली पाहिजेत. आगामी काळात आरोग्यासाठी किती तरतूद आहे, हे आता प्रत्येक नगरसेवकाने व नागरिकाने मुद्दाम तपासले पाहिजे, ती वाढवण्यासाठी सर्वसामान्यांनीही दबाव वाढविला पाहिजे.

सरत्या वर्षाच्या कटू आठवणी विसरायच्या असतील, तर नव्या वर्षासाठी काही संकल्प आवर्जून केले पाहिजेत. राज्य शासन व महापालिकेने शहराच्या पायाभूत आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली पाहिजेत. आगामी काळात आरोग्यासाठी किती तरतूद आहे, हे आता प्रत्येक नगरसेवकाने व नागरिकाने मुद्दाम तपासले पाहिजे, ती वाढवण्यासाठी सर्वसामान्यांनीही दबाव वाढविला पाहिजे.

सरत्या वर्षातील हा शेवटचा रविवार. नववर्षाचे स्वागत करताना आपल्यापैकी प्रत्येकाला हे वर्ष कधी संपेल, कसे विसरता येईल असेच वाटत आहे. याला कारणही तसेच आहे. जगाच्या इतिहासात २०२० हे वर्ष सर्वात खराब वर्ष म्हणून गणले जाणार आहे. जगाने याआधीही अनेक संकटे अनुभवली. जागतिक महायुद्धे झाली, १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची जीवघेणी साथ आली, महामंदीची झळ बसली; पण कोरोनाच्या साथीने जगभर घडविलेला हाहाकार अभूतपूर्व असाच आहे. पुण्याच्या बाबतीतही हेच घडले आहे. शहराच्या शंभर वर्षांच्या इतिहासावर नजर टाकल्यास कोरोनाने पुण्याची जितकी हानी झाली, तितकी अन्य कोणत्याच गोष्टीने घडविलेली नाही. त्यामुळे नव्या वर्षांचे स्वागत करताना आपण या सरत्या वर्षाकडून काय बोध घेणार हे पाहणे उद्‍बोधक ठरणार आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात याआधी प्लेगच्या साथीने हाहाकार माजविला होता. उपलब्ध नोंदीनुसार, १८९७-९८ मध्ये पुण्यात ५,३०२ जणांना प्लेग झाला होता. त्यातील ४,१२५ म्हणजे ८० टक्के रुग्णांचा त्यात बळी गेला होता. यानंतर मात्र पुण्याने इतकी भीषण स्थिती कधी अनुभवली नव्हती. गेल्या शंभर वर्षांत शहराने नेहमी विकासाच्या दिशेनेच वाटचाल केली. शिक्षणापासून प्रगत पुण्याची वाटचाल सुरू झाली. पुढे औद्योगिक विकास, आयटी हब, ऑटो हब अशी गरुडझेप घेत पुणे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन बनले. गेल्या दोन दशकांत शहरात बांधकाम व सेवा क्षेत्रही प्रचंड बहरले.  त्यातून लाखोंच्या हाताला रोजगार मिळाला. असंख्य तरुणांचे आशास्थान असलेल्या या शहरावर कोरोनाने अक्षरशः घाला घातला. मार्चपासून कोरोनाने विळखा घट्ट करायला सुरुवात केली. पुढे लॉकडाऊनच्या फेऱ्यात शहराचे अर्थचक्र ठप्प झाले आणि शहराची रयाच जाऊ लागली. त्यातून शहराची अर्थव्यवस्था अनेक वर्षे मागे गेली. 

Sakal Exclusive: कुत्रा-मांजर नाही, तर चक्क बोकडाचा वाढदिवस केला साजरा!

आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे 
कोरोनाने मोठी जीवितहानी घडवून शहरातील आरोग्यव्यवस्थेपुढेही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५९ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ८,७५४ जणांचा बळी गेला आहे. शहराचा विचार केल्यास पुण्यात पावणेदोन लाख जणांना लागण झाली, तर ४७६८ जणांना जीव गमवावा लागला. महाराष्ट्रात अन्य कोणत्याही शहरात इतकी मोठी जीवितहानी झाली नसेल. बाधितांची संख्या आता आटोक्यात येत असली, तरीही सरत्या वर्षांत शहराच्या आरोग्यव्यवस्थेचे पुरते धिंडवडे निघाले.  

'तू रोज फुकटची दारू पितो' वरून झालं भांडण; वादात दोन मित्रांचा खून

नव्या वर्षाला सामोरे जाताना यातून आपण काही बोध घेणार का हा खरा प्रश्न आहे. की पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणत तेच रडगाणे गात राहणार? पुण्यासारख्या वेगाने विस्तारणाऱ्या शहराचे नियोजन करायचे झाल्यास आधी सार्वजनिक आरोग्यवस्था सुदृढ करण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याआधी २००९ मध्ये स्वाईन फ्लूची साथ आली होती. तेव्हाही पुण्यातच सर्वाधिक हानी झाली; पण कोणत्याच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी; तसेच प्रशासनाने यातून पुरेसा बोध घेतला नाही. त्यामुळेच सर्वसामान्यांची कोरोनाच्या साथीत परवड झाली. २००९ मध्ये पुण्यात स्वाईन फ्लूचे सुमारे पाच हजार रुग्ण सापडले. त्यावेळी संभाव्य साथींचा विचार करून ससून रुग्णालयासाठी नवी ११ मजली अद्ययावत इमारत; तसेच महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे ठरविण्यात आले. आज दहा वर्षांनीही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. ससूनची इमारत बांधून झाली; पण तेथे निधीअभावी अद्ययावत आरोग्यसुविधाच नाहीत. वैद्यकीय महाविद्यालय तर कागदावरच राहिले. या दोन्ही बाबी वेळेत पूर्ण झाल्या असत्या, तर कदाचित कोरोनामध्ये झालेली जीवित व वित्तहानी कमी करता आली असती. कोरोनाच्या तडाख्यानंतर आता कुठे वैद्यकीय महाविद्यालयाला गती आली आहे. हे कशाचे द्योतक आहे? 

नव्या वर्षासाठीचा संकल्प
सरत्या वर्षाच्या या कटू आठवणी विसरायच्या असतील, तर नव्या वर्षासाठी काही संकल्प आवर्जून केले पाहिजेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत याची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे राज्य शासन व महापालिकेने शहराच्या पायाभूत आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली पाहिजेत. महापालिकेच्या सात हजार कोटींच्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठीची तरतदू अवघी चारशे कोटींच्या आसपास असते. हे आता परवडणारे नाही. आगामी काळात आरोग्यासाठी किती तरतूद आहे, हे आता प्रत्येक नगरसेवकाने व नागरिकाने मुद्दाम तपासले पाहिजे. ती वाढवण्यासाठी सर्वसामान्यांनीही दबाव वाढविला पाहिजे. यावर्षी महापालिकेचे उत्पन्नही कमालीचे घटणार आहे. अशा वेळी राज्य शासनाने महापालिकेला अर्थसाह्य केलेच पाहिजे. कारण पुण्यासारख्या शहराचे अर्थचक्र मंदावणे राज्यासाठीही हिताचे नाही. शेवटी शहराचे आरोग्य सुदृढ राहिले, तरच अर्थचक्र अव्याहत सुरू राहील, रोजगार वाढतील आणि प्रगती होणार आहे. सरत्या वर्षांत कोरोनाने दिलेला हा सर्वांत मोठा धडा आहे. यातून वेळीच बोध घेत नव्या वर्षांत पाऊल टाकताना सावर्जनिक आरोग्याची हेळसांड थाबविण्याचा संकल्प करून तो तडीस नेला पाहिजे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dhananjay Bijale on healthy resolution New Year