Sakal Exclusive: कुत्रा-मांजर नाही, तर चक्क बोकडाचा वाढदिवस केला साजरा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 26 December 2020

सध्या ब्रिडींगसाठी बोकडाचा तर उत्पन्नासाठी शेळीचा वापर केला जात आहे. शेतकरी कुटुंबाने एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे पुढच्या पिढ्या उत्तम वंशावळीच्या देऊ शकेल असा बोकड तयार केला. तो आदर्श इतरांनी घ्यावा.

सोमेश्वरनगर : माणसांचे वाढदिवस नित्याचेच. गाय-बैल, कुत्र्या-मांजराचाही वाढदिवस क्वचित कानावर येतो. मात्र, 'बोकड' जातीचा वाढदिवस ही दुर्मिळ घटना होय. पण कोऱ्हाळे खुर्द (ता. बारामती) येथे खोमण्यांच्या गोठ्यावर चक्क टायसन नावाच्या बोकडाचा प्रथम वाढदिवस दणक्यात साजरा झाला. 'टायसन'च्या कौतुकासाठी विविध जिल्ह्यातून लोकं उपस्थित होतीच पण शेळीपालन व्यवसायातील तज्ञ्जांनीही हजेरी लावली होती हे विशेष! गेले चार दिवस सोशल मिडियात 'टायसन'ची हवा चालली आहे.

तुकाराम खोमणे आणि पंकूताई खोमणे या ज्येष्ठ दांपत्याने पारंपारिक शेळीव्यवसाय बदलून फलटण (जि. सातारा) येथील 'निमकर गोट फार्म' या संशोधन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली २०१४-१५ साली बोअर जातीच्या शेळ्यांचा गोठा सुरू केला. बोर (boer) ही दक्षिण आफ्रिकेतील मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या शेळीची जात आहे. १९९२ साली पद्मश्री बनबिहारी विष्णुपंत निमकर यांनी बोरचा गर्भ आणून त्यांच्या फार्ममधे वाढविला. आता भारतभर बोर पसरत आहे. बोर ऐंशी ते दीडशे किलोपर्यंत वाढू शकतात.

Photo: शिवरायांच्या तोरणा किल्ल्यावर स्वच्छता मोहिम; शिवकालीन वस्तू आल्या उजेडात!​ 

पारंपारिकऐवजी बोर, नारी सुवर्णाकडे वळावे यासाठी निमकर फार्म प्रयत्न करत आहे. यास खोमणे दांपत्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. खोमणे यांनी बोर जातीचा बोकड स्वतःच्या फार्ममध्ये योग्य पध्दतीने तयार केला. तो उत्तम वंशावळीचा आणि गुणवत्तेचा असल्याने त्याचा मागील चार-सहा महिन्यात शेळीव्यवसायात बोलबाला झाला. बोरबाबत जनजागृती व्हावी या हेतूने निमकर फार्मचे व्यवसाथपक डॉ. मल्हारी डेंबरे यांनी टायसनप्रेमी नावाने व्हॉ़टसअप ग्रुप केला. नुकताच टायसनचा वाढदिवस झाला त्याला खोमणे गोठ्यावर नगर, कराड, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे अशा विविध जिल्ह्यांतून शे-सव्वाशे शेळीपालक उपस्थित होते. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ. अजित माळी, एमडी जेनेटीक्स संशोधन संस्थेचे लक्ष्मण टकले, विनायक नरवडे, संजय माने अशी तज्ञमंडळी उपस्थित होती. 

#CoronavirusStrain: आणखी दोन देशांमध्ये नव्या कोरोनाची एन्ट्री​

टायसनच्या वाढदिवसाला 'हॅप्पी बड्डे टू यू' अशा घोषात उत्साहात दोन मोठे केक कापण्यात आले. पाहुण्यांना ऐंशी-नव्वद किलोच्या बॉडीबिल्डर टायसनसोबत छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही. डॉ. माळी, टकले यांनी याप्रसंगी शेळीपालकांना मार्गदर्शनही केले. दरम्यान, टायसनच्या वाढदिवसाची छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मिडियात धूम करत असून काहीजण 'आम्हाला का बोलावलं नाही' असा लटका रागही व्यक्त करत आहेत. 

मराठा नेते हे समाजाचे नाही, तर ते फक्त राजकीय पक्षांचे आहेत!​

डॉ. मल्हारी डेंबरे म्हणाले, शेतकरी 'बोर'कडे वळावेत ही निमकर संस्थेची इच्छा आहे. बोर पाऊस, थंडी, उन अशा कुठल्याही स्थितीत टिकू शकते आणि जास्त मांस देते. जगभरातून त्यास मागणी आहे. सध्या ब्रिडींगसाठी बोकडाचा तर उत्पन्नासाठी शेळीचा वापर केला जात आहे. शेतकरी कुटुंबाने एखाद्या संशोधन संस्थेप्रमाणे पुढच्या पिढ्या उत्तम वंशावळीच्या देऊ शकेल असा बोकड तयार केला. तो आदर्श इतरांनी घ्यावा. तर तुकाराम खोमणे यांनी, 'निमकरांनी मार्गदर्शन केले म्हणून राज्यात नाव पोचले' अशी कृतज्ञता व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: birthday of goat named Tyson was celebrated with a bang at Someshwarnagar